भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाच्या निवड समिती सदस्यांचे मानधन वाढवण्याचा निर्णयाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे आता निवड समिती सदस्यांचे वार्षिक पगार ३० लाख रूपयांनी तर मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचा पगार २० लाख रुपयांनी वाढणार आहे.

भारताचे माजी यष्टिरक्षक सबा करीम यांच्या अध्यक्षतेखालील बीसीसीआयच्या क्रिकेट ऑपरेशन विभागाने हा निर्णय घेतला आहे. मानधन वाढीचा प्रस्ताव हा १२ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत क्रिकेट ऑपरेशन्स विभागाने प्रशासकीय समितीच्या सल्ल्याने ठेवला होता. मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांचे वार्षिक मानधन आता ८० लाख रुपयांवरून एक कोटी रूपये झाले आहे. या समितीच्या अन्य दोघांचा वार्षिक पगार ६० लाख रुपयांवरून ९० लाख झाले आहे.

याशिवाय, जूनियर निवड समितीच्या वार्षिक पगारातही वाढ करण्यात आली आहे. सदस्यांची वार्षिक पगार ६० लाख तर मुख्य निवडकर्त्याची वार्षिक पगार ६५ लाख रूपये करण्यात आली आहे. महिला क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या सदस्यांच्या वार्षिक पगारातही भरघोस वाढ करण्यात आली आहे. सदस्यांचा वार्षिक पगार २५ लाख तर मुख्य निवडकरत्याचा पगार ३० लाख करण्यात आला आहे.