टी-२० मालिकेत हार्दिक पांड्याने आपल्या लौकिकाला साजेशी फलंदाजी करत भारतीय संघाच्या मालिकाविजयात मोलाचा वाटा उचलला. दुसऱ्या टी-२० सामन्यात हार्दिकने श्रेयस अय्यरच्या साथीने फटकेबाजी करत १९५ धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं. त्याच्या या खेळीसाठी मालिकावीरीचा किताब देऊन त्याचा गौरव करण्यात आला. परंतू टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समिती हार्दिक पांड्याचा संघात समावेश करायचा की नाही याबद्दल साशंक होती.

अवश्य वाचा – धोनीकडे युवराज होता, हार्दिकलाही अशाच एका आणखी फिनीशरची गरज – आकाश चोप्रा

“हार्दिक पांड्या सध्या गोलंदाजी करु शकत नाही म्हणून त्याची संघात निवड करायला नको असं मत निवड समितीमध्ये काही लोकाचं होतं. पण तो ज्या फॉर्मात आहे आणि ज्या पद्धतीने फलंदाजी करत आहे हे निवड समितीने पाहिलं नाही याचं आश्चर्य वाटलं. अखेरीस हार्दिकची संघात निवड व्हावी यासाठी बराच वेळ समजूत काढावी लागली. यानंतर हार्दिकला संघात स्थान मिळालं, नाहीतर त्याची संघात निवड होणार नव्हती. अशा परिस्थितीत भविष्याचा विचार व्हायला हवा. हार्दिक सध्या गोलंदाजी करु शकतो की नाही यापेक्षा आगामी टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीकोनातून तो संघासाठी महत्वाचा खेळाडू आहे.” बीसीसीआयमधील सूत्रांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती दिली.

दरम्यान, वन-डे आणि टी-२० मालिका पार पडल्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सज्ज झाला आहे. १७ डिसेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅडलेडच्या मैदानावर दिवस-रात्र कसोटी सामना खेळवला जाणार आहे. टी-२० मालिकेतली हार्दिकची कामगिरी पाहून त्याला कसोटी संघातही स्थान देण्याची मागणी होते आहे. परंतू भारताचा कर्णधार विराट कोहलीने हार्दिक गोलंदाजी करायला लागल्याशिवाय त्याचा कसोटी संघासाठी विचार करणं शक्य नसल्याचं स्पष्ट केलंय.