पाकिस्तानात ‘Asian Emerging Nations Cup’ ही स्पर्धा होऊ घातली आहे. मात्र, आम्हाला न विचारता या स्पर्धेचं ठिकाण पाकिस्तानात ठरवल्याचा आरोप करत BCCI या स्पर्धेला मोडता घालण्याच्या तयारीत आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असलेला दबदबा लक्षात घेता, पाकिस्तानच्या तुलनेत भारताच्या पारड्यात माप पडेल आणि स्पर्धेचं ठिकाण बदलेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.२९ ऑक्टोबररोजी लाहोर येथे झालेल्या आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत पाकिस्तानला आगामी ‘Asian Emerging Nations Cup’ स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क देण्यात आले. या बैठकीला बीसीसीआयच्या कोणत्याही अधिकाऱ्याने हजेरी लावली नव्हती. मात्र सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी दुबईत झालेल्या बैठकीत बीसीसीआयने, क्रिकेट परिषदेच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भारताचं मत विचारात न घेता स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय घेण्यात आल्याचा बीसीसीआयचा आक्षेप आहे.

जोपर्यंत अतिरेकी हल्ले थांबत नाहीत तोपर्यंत पाकिस्तानशी क्रिकेट न खेळण्याचा निर्णय घेतल्याने, भारत या स्पर्धेसाठी आपला संघ पाठवण्याची शक्यता कमीच असल्याचं कळतंय. श्रीलंकेच्या संघाने काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा दौरा केला असल्यामुळे, या स्पर्धेत लंकेचा सहभाग निश्चित मानला जातोय. मात्र बीसीसीआयचा विरोध पाहता पाकिस्तान स्पर्धेच्या यजमानपदाचे हक्क गमावून बसवण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ ने यासंदर्भातलं वृत्त प्रसारित केलं आहे.

अवश्य वाचा – BCCI ला नाही भ्रष्टाचाराचं वावडं – नीरज कुमारांचा घरचा आहेर

दहशतवादाच्या मुद्द्यावरुन गेल्या काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये कोणत्याही प्रकारे क्रिकेटचे सामने खेळवण्यात येत नाहीयेत. आयसीसीच्या स्पर्धांव्यतिरीक्त भारत-पाकिस्तानचे संघ आतापर्यंत एकदाही समोरासमोर आलेले नाहीयेत. सीमेपलीकडून होणाऱ्या हल्ल्यांचं कारण देत भारतीय सरकारने दोन देशांमध्ये खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांना परवानगी दिली नाकारली आहे. दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवण्यासाठी बीसीसीआय आणि पीसीबीत झालेला करार मोडल्याने सध्या पाकिस्तानने आयसीसीकडे दाद मागितली आहे. या सर्व घडामोडींनंतर बीसीसीआय पुन्हा एकदा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.

२००९ साली श्रीलंकेच्या संघावर लाहोरमध्ये अतिरेकी हल्ला झाल्यानंतर, पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यावर आयसीसीने बंदी घातली होती. तब्बल ८ वर्षांच्या खंडानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केलेल्या पाठपुराव्यामुळे World XI संघाने पाकिस्तानचा दौरा केला होता. यानंतर श्रीलंकेचा संघही पाकिस्तानात येऊन काही सामने खेळला. त्यामुळे बीसीसीआयच्या विरोधानंतर आशियाई क्रिकेट परिषद काय पाऊल उचलते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा – कटकच्या मैदानात ८ विक्रमांची नोंद, धोनीकडून एबी डिव्हीलियर्सचा विक्रम मोडीत