२०११ साली कोची टस्कर्स केरळ या संघाशी झालेला करार रद्द केल्याप्रकरणी बीसीसीआयला नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या माहितीनूसार ही रक्कम ८०० कोटींपेक्षा जास्त असल्याचं समजतंय. आज आयपीएलच्या सर्वसाधारण परिषदेच्या बैठकीत कोचीला देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी कोची टस्कर्सच्या प्रशासनाने ८५० कोटी रुपयांची मागणी केली. कोचीच्या प्रशासनाने दिलेला हा प्रस्ताव सर्वसाधारण बैठकीत मांडला जाईल आणि यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली.

अवश्य वाचा – खेळात धर्म आणू नका, मुस्लिम खेळाडूवरुन राजकारण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याला हरभजनने सुनावले

कराराचा भंग केल्याप्रकरणी बीसीसीआय आणि कोची टस्कर्स यांच्यात सुरु असलेल्या न्यायालयीन वादात कोचीच्या प्रशासनाची बाजू न्यायालयाने ग्राह्य धरली. यानंतर आर.सी. लाहोटी समितीने बीसीसीआयला कोची टस्कर्सला ५५० कोटींची नुकसान भरपाई आणि वेळेत रक्कम न दिल्यास १८ टक्के व्याज इतका दंड ठोठावला. गेल्या दोन वर्षांपासून बीसीसीआय या प्रकरणी चालढकल करण्याचा प्रयत्न करण्यात येत होती.

आमच्यासमोरील सर्व कायदेशीर पर्याय आता संपलेले आहेत. कराराचा भंग केल्याप्रकरणी निकाल आमच्या विरुद्ध गेल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणं हे वेडेपणाचं लक्षण ठरेल. त्यामुळे कोचीच्या प्रशासनाला नुकसान भरपाईची रक्कम देणं आम्हाला अनिवार्य आहे. फक्त ती रक्कम किती द्यायची हा प्रश्न असल्याचं आयपीएल सर्वसाधारण परिषदेच्या सदस्याने ‘पीटीआय’शी बोलताना सांगितलं.

अवश्य वाचा – ‘हा’ खेळाडू यष्टीरक्षक म्हणून धोनीपेक्षाही सरस : सौरव गांगुली

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या कारकीर्दीत बीसीसीआयने कोची टस्कर्स संघासोबत असलेला करार रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. यापूर्वी कोचीच्या अधिकाऱ्यांनी बीसीसीआयकडे ३०० कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र, बीसीसीआयमधली काही अधिकाऱ्यांनी आडमुठेपणाची भूमिका घेत कोचीच्या अधिकाऱ्यांची विनंती धुडकावली. यामुळेच बीसीसीआयला नुकसानभरपाई म्हणून अधिक रक्कम द्यावी लागणार असल्याचं कळतंय.