भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षक पदासाठी BCCI ने अर्ज मागवले होते. या पदासाठी एकूण २८ जणांनी अर्ज केला होता. त्यापैकी अखेर ३ नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली असल्याचे वृत्त स्पोर्ट्सकीडाने दिले आहे. शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या अर्जामध्ये दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू गॅरी कर्स्टन आणि हर्षल गिब्स यांच्याबरोबर रमेश पोवार याचाही अर्ज आहे. त्यामुळे रमेश पोवारचीच पुन्हा या पदी वर्णी लागण्याची अधिक शक्यता असल्याचे वर्तवण्यात येत आहे.

गॅरी कर्स्टन आणि हर्षल गिब्स

महिला टी२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे BCCI नव्या प्रशिक्षकाच्या शोधात असल्याचे समजत होते. त्यामुळे हे अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार या तिघांव्यतिरिक्त भारताचा माजी गोलंदाज मनोज प्रभाकर, माजी क्रिकेटपटू टॉम मूडी, डेव्ह व्हॉटमोअर, वेंकटेश प्रसाद, रे जेनिंग्ज हेदेखील प्रशिक्षकपदाच्या शर्यतीमध्ये असल्याचे बोलले जात होते.

कॅरेबियन बेटांवर झालेल्या टी-20 विश्वचषकापर्यंत रमेश पोवार यांची महिला संघाच्या हंगामी प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार १४ डिसेंबरपर्यंत इच्छुक उमेदवार BCCI कडे अर्ज करु शकणार होते. आता २० डिसेंबरला भारताचे माजी खेळाडू कपिल देव आणि अंशुमन गायकवाड यांची समिती उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. निवड झालेल्या उमेदवाराशी BCCI दोन वर्षांचा करार करणार असून त्याला वार्षिक ३ ते ४ कोटी रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय हे प्रशिक्षक निवडीच्या प्रक्रियेतील अंतिम निर्णय घेणार आहेत, असे सांगण्यात येत आहे.