उत्तर प्रदेशचा डावखुरा फिरकिपटू शिव सिंगने २३ वर्षांखालील मुलांच्या सी.के. नायडू क्रिकेट स्पर्धेत बंगालविरुद्ध खेळताना ३६० अंशाच्या कोनात गोल फिरून गोलंदाजी केली. या चेंडू फेकण्याच्या शैलीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यामुळे त्याचा हा चेंडू ‘डेड बॉल’ ठरवण्यात आला होता. मात्र, या प्रकारच्या गोलंदाजीच्या शैलीने मला गोलंदाजी करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी शिवने BCCIकडे केली आहे.

हा आहे तो ‘डेड बॉल’

शिव सिंगने ३६० अंशाच्या कोनात फिरत गोलंदाजी करत फलंदाजाला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न केला असे म्हणत त्याचा तो चेंडू पंच विनोद शेषनने ‘डेड बॉल’ घोषित केला होता. याबाबत शिवने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की मी टाकलेल्या शैलीत मला काहीही अयोग्य वाटत नाही. सध्याच्या घडीला अनेक फलंदाज ठरवून दिलेल्या नियमांना छेद देत फलंदाजी करतात. त्यांच्याबाबत काहीही का बोलले जात नाही? मी केवळ नियमित गोलंदाजीच्या शैलीत थोडा बदल आणला आहे आणि माझी शैली BCCIने मान्य करावी, असे मला वाटते.

विजय हजारे करंडक आणि स्थानिक क्रिकेट स्पर्धेत मी अनेकदा अशा शैलीने गोलंदाजी केली आहे. पण तेव्हा चेंडू डेड बॉल ठरवण्यात आला नव्हता, अशी माहितीही त्याने दिली. दरम्यान, या सामन्यात बंगालचे दोन्ही फलंदाज तगडय़ा भागीदारीच्या दिशेने वाटचाल करत होते. त्यांची जोडी फोडण्यासाठी अनेक गोलंदाजांनी प्रयत्न केले मात्र, त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांची एकाग्रता भंग करण्यासाठी शिव सिंगने आपल्या षटकांत अनोखा प्रयोग केल्याचे म्हटले जात आहे.