गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरसाठी सुरु असलेली बीसीसीआयची शोधमोहीम अखेरीस संपली आहे. टीम इंडियाच्या किट स्पॉन्सरसाठी बीसीसीआय आणि MPL (Mobile Premiere League) यांच्यात ३ वर्षांचा करार झाला आहे. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२३ पर्यंत हा करार करण्यात आला असून या मार्फत बीसीसीआयला प्रत्येक सामन्यामागे ६५ लाखांचा निधी मिळणार आहे.

लॉकडाउन काळात टीम इंडियाचा किट स्पॉन्सर असलेल्या Nike कंपनीने करार वाढवून घेणार नसल्याचं जाहीर केलं होतं. यानंतर बीसीसीआयने नवीन स्पॉन्सरसाठी शोध सुरु केला होता. मध्यंतरीच्या काळात टीम इंडियाला किट स्पॉन्सर मिळत नसल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. परंतू अखेरीस बीसीसीआयने MPL सोबत करार करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. प्रत्येक सामन्यासाठी ६५ लाख आणि merchandising साठी वर्षाला ३ कोटी रुपये MPL बीसीसीआयला देणार आहे.

सध्या भारतीय खेळाडू युएईत आयपीएल स्पर्धा खेळत आहेत. १० नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना संपला की भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होईल. या दौऱ्यात भारतीय संघ ३ वन-डे, ३ टी-२० आणि ४ कसोटी सामने खेळणार आहे. २७ नोव्हेंबर पासून टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून सिडनीच्या मैदानावर पहिला सामना रंगणार आहे.