भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेचा (नाडा) इशारा आणि  आगामी आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्यासाठीची सरकारी परवानगी हे विषय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय) केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या झालेल्या बैठकीत ऐरणीवर होते.

भारतीय क्रिकेटपटूंना उत्तेजक चाचणीसंदर्भात ‘नाडा’ने बंधने घालण्याची तयारी केली होती. मात्र बीसीसीआयने ती मागणी धुडकावली होती. जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संस्थेशी (वाडा) निगडित एका कंपनीकडून क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी होत असते, त्यामुळे ‘नाडा’च्या मार्गदर्शक तत्त्वांची आवश्यकता नसल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले होते.

बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी आणि महाव्यवस्थापक (प्रशासन आणि खेळ विकास) प्रा. रत्नाकर शेट्टी यांनी क्रीडामंत्र्यांशी ४५ मिनिटे चर्चा केली.  ‘‘उत्तेजक प्रतिबंधक धोरणासंदर्भात चांगली माहिती असलेल्या शेट्टी यांच्यासोबत जोहरी बीसीसीआयचे प्रतिनिधित्व करतील, हे आधीच ठरले होते. या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली, मात्र महत्त्वाचा विषय हा उत्तेजक प्रतिबंधक धोरण हाच होता,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.

बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा ९ डिसेंबरला होणार आहे. क्रीडामंत्र्यांशी झालेल्या बैठकीनंतर ‘नाडा’चा विषय कार्यक्रमपत्रिकेत समाविष्ट करण्यात आला आहे. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांचे मत स्पष्ट होऊ शकले नाही.

राठोड यांनी क्रीडामंत्रीपद सांभाळल्यानंतर त्यांच्याशी भेट घेण्याची बीसीसीआयची योजना होती. त्यामुळे घेण्यात आलेल्या या बैठकीत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांचा विषयही चर्चेत आला. पाकिस्तानशी क्रिकेट खेळणे, हा विषय फक्त क्रीडा मंत्रालयाच्या अखत्यारित येत नाही, तर पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालय यांच्याही अखत्यारित येतो, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

२०१३ मध्ये पाकिस्तानचा संघ तीन एकदिवसीय आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारतात आला होता. त्या वेळी पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली होती, तर ट्वेन्टी-२० मालिका बरोबरीत सुटली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये कोणतीही क्रिकेट मालिका झालेली नाही.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भविष्यातील क्रिकेट कार्यक्रमपत्रिकेनुसार प्रत्येक सदस्य राष्ट्राला अन्य देशाशी मालिका खेळणे बंधनकारक ठरते. परंतु भारत पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळू शकत नसेल, तर त्यांचे गुण कमी होतील.

२०१४ मध्ये बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार २०१५ ते २०२३ या कालावधीत सहा मालिका खेळण्याची योजना होती. मात्र दोन्ही देशांमधील राजनैतिक वातावरण बिघडल्यामुळे भारताने पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळण्यास नकार दिला होता. या पाश्र्वभूमीवर पीसीबीने बीसीसीआयला नुकसानभरपाईचा दावा करणारी नोटीस पाठवली होती.