भारत-पाकिस्तान क्रिेकेट सामन्यांवरुन, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मणी यांची बीसीसीआयवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. सध्या दोन्ही देशांमध्ये बिघडलेल्या वातावरणामुळे कोणतेही सामने होत नाहीयेत, मात्र आयसीसीच्या स्पर्धांमध्ये हे दोन्ही संघ खेळतात. बीसीसीआय भारत-पाक सामने खेळवण्यावरुन ढोंगीपणा करत असल्याचं एहसान मणी यांनी म्हटलं आहे. ते EspnCricinfo या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

भारत-पाकिस्तान या देशांमध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जावे ही दोन्ही देशांच्या लोकांची इच्छा आहे. असं झाल्यास दोन्ही देशांमधले संबंध सुधारु शकतात. क्रिकेट सामन्यांसाठी पाकचे चाहते भारतात येतील, भारताचे चाहते पाकिस्तानात जातील; अशा गोष्टींमधून बिघडलेले संबंध पुन्हा सुधारता येऊ शकतात. मात्र बीसीसीआय या मुद्द्यावर ढोंगीपणा करत आहे. त्यांना आमच्याविरोधात आयसीसी आणि आशिया चषकासारख्या स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी समस्या नाहीयेत. फक्त दोन देशांमध्ये मालिका खेळवायला त्यांना प्रॉब्लेम आहे, या गोष्टीवर तोडगा काढणं गरजेचं असल्याचं, मणी यांनी म्हटलं आहे.

“दोन्ही देशातील चाहत्यांना भारत-पाक सामने हवे आहेत. मात्र भारतात 2019 च्या निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत या मुद्द्यावर काही तोडगा निघेल असं मला वाटत नाही.” सध्या पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटात आहे, या कारणासाठी पाकिस्तानला भारताविरुद्ध सामने हवे आहेत असा आरोप पाकिस्तानवर होत होता. मात्र भारताविरुद्ध खेळलो नाही तरी पाकिस्तान क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या कसलाही धोका नाही, पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आपला कारभार व्यवस्थीत चालवू शकतं असं मणी यांनी स्पष्ट केलं.

क्रीडा, सांस्कृतीक सोहळ्यांच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले बिघडलेले संबंध सुधारले जाऊ शकतात. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड पैशासाठी भारताविरुद्ध सामने खेळायला मागत नाहीये, असंही मणी म्हणाले. बीसीसीआय आणि पीसीबीमध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी करार करण्यात आला होता. मात्र सीमेपलिकडून होणाऱ्या दहशतवादाचं कारण देत बीसीसीआयने पाकविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. यावरुन पीसीबीने आयसीसीच्या तंटा निवारण लवादाकडे दाद मागितली असून यावर सुनावणी होणं बाकी आहे.