News Flash

सर्व घरगुती क्रिकेट स्पर्धा IPL संपेपर्यंत स्थगित; करोनाच्या पार्श्वभूमीवर BCCI चा मोठा निर्णय

सचिव जय शाह यांनी सर्व राज्यांतील क्रिकेट संघटनांना लिहिलं पत्र

देशामध्ये करोनाबाधितांचा आकडा पुन्हा वाढू लागल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने सर्व वयोगटातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा स्थगित केल्या आहेत. या निर्णयामुळे विनू माकंड चषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे. तसेच इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलनंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असं बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे.

बीसीसीआयने राज्यांमधील क्रिकेट मंडळांना पत्र लिहून यासंदर्भातील माहिती दिली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी करोना परिस्थितीचा संदर्भ देत सध्या सर्व वयोगटातील क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. वेगवेगळ्या शहरांमधील प्रवास आणि बायो बबलसारख्या गोष्टींची आवश्यकता या स्पर्धांमध्ये लागत असल्याने सध्या त्या स्थगित करणअयाचा निर्णय घेण्यात आलाय.

“घरगुती क्रिकेटचा यंदाचा सीजन म्हणजेच २०२०-२१ चा सीजन देशभरामध्ये सुरु असणाऱ्या लॉकडाउनमुळे उशीरा सुरु झाला होता. अगदी जानेवारी २०२१ मध्ये घरगुती क्रिकेट स्पर्धांना सुरुवात झाली. बीसीसीआयच्या ८९ व्या सर्वसाधारण वार्षिक बैठकीमध्ये यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल लिलावाआधी सय्यद मुस्ताक अली चषक स्पर्धेपासून घरगुती क्रिकेट स्पर्धांना पुन्हा सुरुवात करण्यात आली. त्यानंतर विजय हजारे चषक ही देशांतर्गत टी-२० मालिका यशस्वीपणे खेळवण्यात आली. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये या मालिकेतील सामने खेळवण्यात आले. १४ मार्च रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन विरुद्ध मुंबई क्रिकेट असोसिएशनदरम्यानचा अंतिम सामना खेळवण्यात आला,” असं शाह यांनी म्हटलं आहे.

“सध्या महिलांच्या वरीष्ठ गटातील एकदिवसीय सामन्यांची मालिका देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवली जात असून अंतिम सामना चार एप्रिल रोजी होणार आहे. या मौसमात वेगवेगळ्या वयोगटातील जास्तीत जास्त घरगुती सामने खेळवण्याचा आमचा प्रयत्न असला तरी सध्याची परिस्थिती पाहता आम्हाला सर्वच वयोगटातील क्रिकेट मालिका स्थगित करण्याचा निर्णय घ्यावा लागतोय. करोना रुग्णांची वाढती संख्या आणि सामन्यांसाठी एका शहरामधून दुसऱ्या शहरात करावा लागणारा प्रवास, क्वारंटाइनसंदर्भातील नियम आणि बायो बबल्स यासारख्या सर्वच गोष्टी लक्षात घेता हे सामने स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे,” असं शाह यांनी पत्रामध्ये नमूद केलं आहे.

तसेच पुढे या पत्रामध्ये बीसीसीआयच्या सचिवांनी देशामध्ये लवकरच बोर्डाच्या परीक्षा होणार असून सर्वच वयोगटातील घरगुती क्रिकेट मालिका आयपीएलनंतर खेळवणं फायद्याचं ठरेल असं म्हटलं आहे. आयपीएलचा २०२१ च्या हंगाम ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान खेळवला जाणार आहे. “काही राज्यांमधील परिस्थिती सामने आयोजित करण्यासारखी नाहीय. तसेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा लवकरच होणार असल्याने सामने रद्द केल्यास तरुण क्रिकेटपटुंना त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करता येईल. तसेच आमच्या खेळाडूंचे आरोग्य आणि सुरक्षा याचा आमचे सर्वात आधी प्राधान्य आहे. आयपीएल २०२१ नंतर शक्य असेल तेव्हा नक्कीच आम्ही सर्व वयोगटातील क्रिकेटचे सामने आयोजित करु, अशी मला खात्री आहे,” असंही शाह यांनी पत्राच्या शेवटी म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 17, 2021 8:00 am

Web Title: bcci suspends all age group tournaments with eye on covid 19 situation scsg 91
टॅग : Coronavirus
Next Stories
1 सिंधू जेतेपदाचा दुष्काळ संपवणार?
2 भारतीय महिलांची प्रतिष्ठेसाठी झुंज!
3 लांब उडीपटू श्रीशंकर ऑलिम्पिकसाठी पात्र
Just Now!
X