विविध वयोगटांच्या स्पर्धामध्ये वय चोरी केल्याप्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) २२ खेळाडूंवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
या २२ खेळाडूंमधील नितिश राणा आणि प्रत्युष सिंग हे दोन्ही खेळाडू दिल्लीच्या वरिष्ठ संघातून खेळले आहेत. राणा हा अजूनही दिल्लीच्या संघात आहे. या संदर्भातील संदेश (ई-मेल) बीसीसीआयचे खेळ विकास व्यवस्थापक रत्नाकर शेट्टी यांनी डीडीसीएला पाठवला आहे. या संदर्भात भारताचे माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी गेल्या वर्षी एफआयआर दाखल केली होती.
याबाबत डीडीसीएचे अध्यक्ष स्नेह प्रकाश बंसल यांनी सांगितले की, ‘‘ या २२ खेळाडूंच्या जन्मदाखल्याबाबत अनिश्चितता असून याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आले आहे. बीसीसीआयच्या निर्णयानुसारच आम्ही या खेळाडूंचे भवितव्य ठरवणार आहोत. राणा हा रणजी स्पर्धेत खेळत असून या स्पर्धेसाठी कुठल्याही वयाचे बंधन नसते, कारण ही बंदी फक्त विविध वयोगटांतील स्पर्धासाठी आहे.’’