विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नवीन वर्षात सज्ज झाला आहे. घरच्या मैदानावर भारतीय संघ सर्वात आधी श्रीलंका आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. मात्र या दौऱ्याआधीच BCCI ने विराट कोहलीला दणका दिला आहे. कर्णधाराच्या हाती असलेला महत्वाचा निर्णय काढून घेत BCCI ने आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

अवश्य वाचा – पुरेशी माहिती नसताना CAA बद्दल मी बोलणं योग्य ठरणार नाही – विराट कोहली

काय आहे नेमकं प्रकरण ??

टीम इंडिया परदेश दौऱ्यावर असताना, खेळाडूंना आपल्या बायको किंवा गर्लफ्रेंडला सोबत घेऊन जाता येतं. मध्यंतरी या मुद्द्यावरुन बीसीसीआयमध्ये अनेक वाद झाले होते. पत्नीला सोबत येण्याची संधी द्यावी अशी मागणी काही भारतीय खेळाडूंनी केली होती. ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या क्रिकेट प्रशासकिय समितीने याबद्दल कर्णधार विराट आणि प्रशिक्षक शास्त्रींच्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते.

मात्र यापुढे कोणत्याही खेळाडूला आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला परदेश दौऱ्यात सोबत घेऊन जायचं असेल तर त्याला आधी बीसीसीआयकडे परवानगी मागावी लागणार आहे. “हा मुद्दा फार काही मोठा नाहीये, मात्र याबद्दलची परवानगी बीसीसीआयकडून घेणंच रास्त ठरेल”, BCCI अधिकाऱ्याने नाव न घेण्याच्या अटीवर हिंदुस्थान टाइम्स वृत्तपत्राला माहिती दिली.

श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ५ टी-२०, ३ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यासंदर्भात पत्नी आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंडबद्दल बीसीसीआय नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – IND vs SL : पहिल्या टी-२० सामन्यात महत्वाचा बदल, जाणून घ्या काय घडलंय…