नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) २० सप्टेंबरला होणाऱ्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत लैंगिक छळ प्रतिबंधक धोरण आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंची प्रलंबित नुकसानभरपाई हे विषय चर्चेला असतील.

लैंगिक छळाच्या तक्रारी आल्यास कशा प्रकारे कारवाई करावी, याचे धोरण ‘बीसीसीआय’कडे नाही. ‘बीसीसीआय’चा राजीनामा दिलेले मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याबाबतच्या लैंगिक छळाच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी अंतर्गत समिती नियुक्त करण्यात आली होती.

’  इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटला १९ सप्टेंबरपासून पुन्हा प्रारंभ होत असल्यामुळे पदाधिकारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असतील. त्यामुळे ही बैठक ऑनलाइन स्वरूपाचीच असणार आहे.

’  १७ ऑक्टोबरपासून अमिरातीत सुरू होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि २०२१-२२चा देशांतर्गत क्रिकेट हंगाम याविषयीही बैठकीत चर्चा होईल. येत्या हंगामात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा जानेवारीला सुरू होणार आहे.