पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यास बंदी घालावी किंवा भारताने तरी या स्पर्धेतून माघार घ्यावी, अशी मागणी गेल्या काही दिवासांपासून क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांकडून होत आहे. मात्र, वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानवर बंदी घालण्यासंदर्भात भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) किंवा प्रशासकीय समितीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी) कोणतेही पत्र लिहिलेले नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. तसेच पाकिस्तानवर बंदी घालण्याची मागणी भारताने केल्यास ती ‘आयसीसी’ फेटाळू शकेल. भारतीय संघाचा १६ जूनला मँचेस्टर येथे पाकविरुद्ध सामना होणार आहे.

आयसीसीच्या घटनेनुसार पात्र ठरलेल्या कोणत्याही राष्ट्राला सहभागी होण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना विश्वचषकापासून रोखण्यासाठी कोणताही नियम साह्य ठरणार नाही, असे ‘बीसीसीआय’च्या एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानच्या नेमबाजांना दिल्ली येथे चालू असलेल्या विश्वचषक नेमबाजी स्पर्धेसाठी व्हिसा मिळालेला नाही. याचप्रमाणे विश्वचषकामधील पाकिस्तानविरुद्धच्या लढती भारताने खेळू नये, अशी मागणी होत आहे.

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा प्रभाव भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेट खेळाडूंवरही झाला आहे. या हल्ल्यानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली, हरभजन सिंग सारख्या अनेक बड्या खेळाडूंनी पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडण्यात यावे असा पवित्रा घेतला. तसेच   भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना न खेळण्याचीही मागणी जोर धरत आहे.