देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेतून दुलीप, देवधर, इराणी वजा

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०२१-२२ या क्रिकेट हंगामाचा प्रारंभ सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेने करण्याचे नियोजन केले आहे. याचप्रमाणे प्रतिष्ठेच्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.

दुलीप करंडक, देवधर करंडक आणि इराणी करंडक या स्पर्धा मात्र कार्यक्रम पत्रिकेतून वजा करण्याचे धोरण ‘बीसीसीआय’ने आखले आहे. ‘बीसीसीआय’च्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत या प्रस्तावित देशांतर्गत क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेवर चर्चा करण्यात आली. भारतात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धा सप्टेंबरच्या मध्यावर सुरू होईल आणि ऑक्टोबपर्यंत चालेल.

गतवर्षी २०२०-२१ हंगामात करोनाच्या साथीमुळे रणजी करंडक स्पर्धा ८७ वर्षांत प्रथमच रद्द करण्यात आली होती. मात्र मुश्ताक अली ट्वेन्टी-२० आणि विजय हजारे एकदिवसीय अशा दोनच स्पर्धा झाल्या होत्या.

सध्या देशात करोनाची साथ वाढत असतानाही आगामी क्रिकेट हंगाम होऊ शकेल, यासाठी ‘बीसीसीआय’ आशावादी आहे.आगामी क्रिकेट हंगामातून पाच महिलांच्या क्रिकेट स्पर्धानाही काट मारण्यात आली आहे. गतवर्षी फक्त राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धा झाली होती. पुढील हंगामात वरिष्ठ गटातील महिलांसाठी ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय प्रकारातील दोन स्पर्धाचे अनुक्रमे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयोजन करण्यात येणार आहे.

पुरुषांसाठी क्रिकेट स्पर्धा

                   क्रिकेट स्पर्धा           तारखा

* वरिष्ठ गट

सय्यद मुश्ताक अली (ट्वेन्टी-२०)   सप्टेंबर-ऑक्टोबर २०२१

विजय हजारे (एकदिवसीय)        नोव्हेंबर २०२१

रणजी करंडक (प्रथम श्रेणी)       डिसेंबर २०२१-मार्च २०२२

* २३ वर्षांखालील

राष्ट्रीय (एकदिवसीय)           ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२१

सी. के. नायडू                         डिसेंबर २०२१-मार्च २०२२

* १९ वर्षांखालील

मंकड (एकदिवसीय)             ऑक्टोबर २०२१

चॅलेंजर (एकदिवसीय)            नोव्हेंबर २०२१

कूचबिहार करंडक                  नोव्हेंबर २०२१-जानेवारी २०२२

* १६ वर्षांखालील   

विजय र्मचट                           ऑक्टोबर-डिसेंबर २०२१