ऑस्ट्रेलियात आयोजित टी-२० विश्वचषकाचं आयोजन आयसीसीने पुढे ढकललं आणि बीसीसीआयचा जीव भांड्यात पडला. आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं आयोजन करण्यासाठी बीसीसीआयचा रस्ता आता मोकळा झाला आहे. यंदाच्या हंगामाची स्पर्धा ही युएईमध्ये खेळवली जाणार असल्याची माहिती, गव्हर्निंग काऊन्सिलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी दिली होती. यासाठी बीसीसीायने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे. अद्याप याबद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने यंदाच्या परदेशवारीसाठी विमान कंपन्यांसोबत चर्चा सुरु केलेली असल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – IPL होऊच नये यासाठी शशांक मनोहर होते प्रयत्नशील! माजी पाक खेळाडूचा दावा

बीसीसीआयचे काही अधिकारी Emirates आणि Etihad या विमान कंपनीसोबत चर्चा करत आहेत. ऑगस्ट महिन्यात खेळाडूंना भारत ते युएई प्रवास करायचा असेल तर विमानांचं बुकींग व इतर गोष्टींवर काम सुरु झाल्याचं वृत्त IANS वृत्तसंस्थेने दिलंय. दिल्ली, मुंबई, कोलकाता अशा विविध आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन खेळाडूंना युएईमध्ये न्यावं लागणार आहे. यासाठी काय-काय तयारी करावी लागेल याचा अंदाज घेतला जात आहे.

खेळाडूंव्यतिरीक्त बीसीसीआयचे काही अधिकारी दुबई, शारजाह आणि अबु धाबी येथे तयारी कशी सुरु आहे याचा आढावा घेणार आहेत. आयोजनाच्या बाबतीत आयपीएल स्पर्धा आपलं नाव राखून आहे. त्यामुळे यंदा युएईमध्ये स्पर्धा आयोजित होत असल्यामुळे कोणतीही गोष्ट कमी राहता कमा नये यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत खेळाडूंसाठी विमानाची सोय होत नसेल तर त्यांच्यासाठी खासगी चार्टर्ड विमानांची सोय करण्यात येईल असंही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने IANS शी बोलताना सांगितलं. यासोबतच खेळाडूंसाठी राहण्याची व्यवस्था कोणत्या हॉटेलमध्ये करण्यात येईल याबद्दल अभ्यास सुरु असल्याचं बीसीसीआय अधिकाऱ्याने सांगितलं.