बीसीसीआयचे अध्यक्ष शशांक मनोहर यांचे स्पष्टीकरण
दोन वर्षांपूर्वी भारत दौरा अर्धवट सोडल्याबद्दल वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळावर (डब्ल्यूआयसीबी) लादण्यात आलेला चार कोटी १९ लाख ७० हजार डॉलरचा दंड माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर यांनी दिली आहे. त्या मालिकेतील उर्वरित सामने २०१७मध्ये खेळवण्यात येणार आहेत, असे मनोहर यांनी सांगितले.
जून महिन्यात भारतीय संघ कॅरेबियन दौऱ्यावर जाणार असून, यावेळी ते चार कसोटी सामने खेळणार आहेत, अशी घोषणा झाली, तेव्हाच दोन मंडळांमधील संबंध सुधारल्याची ग्वाही मिळाली.
‘‘दोन्ही मंडळांमधील वाद निवळला आहे. पुढील वर्षी ते भारतात मालिका खेळायला येत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे,’’ असे मनोहर यांनी सांगितले. मे महिन्याअखेरीस मालिकेचे वेळापत्रक निश्चित करण्यात येणार आहे. डब्ल्यूआयसीबीचे अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनीही या घडामोडींना पुष्टी दिली आहे.
ऑक्टोबर २०१४मध्ये झालेल्या मानधनाच्या वादावरून ड्वेन ब्राव्होच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिजचा संघ धरमशालाचा चौथा सामना संपल्यावर मायदेशी परतला होता.