बहुप्रतिक्षित IPL 2020साठी २० ऑगस्टपासून सर्व संघांना युएईला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपासून स्पर्धेची सुरुवात होणार आहे. सर्व संघ आणि खेळाडू हळूहळू IPLसाठी बॅग्ज पॅक करून तयार आहेत. सर्व संघ लवकरच युएईसाठी प्रयाण करणार आहेत. याचदरम्यान, BCCIने IPL 2020 साठी युएईला जाणाऱ्या खेळाडूंना आणि संघमालकांना ‘वॉर्निंग’ दिली आहे.

BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने यासंबंधी ‘आयएएनएस’शी बोलताना माहिती दिली. “युएईमध्ये सुरक्षित अशा बबलमध्ये प्रवेश केल्यानंतर कोणीही इकडे-तिकडे भटकत बसू नये अशी सक्त ताकीद सर्व खेळाडू, प्रशिक्षक वर्ग, संघमालक आणि इतर सहकारी कर्मचारी वर्ग यांना देण्यात आली आहे. एखाद्या खेळाडूच्या किंवा व्यक्तीच्या चुकीमुळे इतरांना करोनासारख्या भयानक आजाराची लागण होणं हे व्यवस्थापनाला अजिबातच मान्य नाही. खेळाडूंच्या सुरक्षिततेसंबंधीची सर्व काळजी युएईमधील घेतली जाणार आहे. आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सेवा त्यांना पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे संघमालकांनादेखील जैव-सुरक्षित बबल सोडून बाहेर भटकू नये अशी वॉर्निंग देण्यात आली आहे”, अशी माहिती BCCIच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

“अनेक अडथळे पार करून अखेर IPL 2020चे आयोजन करण्यात येत आहे. त्यासाठी साऱ्यांनाच परिश्रम घ्यावे लागले आहेत. अशा परिस्थितीत कोणा एकाच्या चुकीचा परिणाम साऱ्यांना भोगावा लागू नये यासाठी कडक असे नियम व प्रोटोकॉल ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे IPL स्पर्धेच्या विनाविघ्न आयोजनासाठी साऱ्यांनी या नियमांचे पालन करणं बंधनकारक असणार आहे”, असेही त्या अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, अभिनेत्री प्रिती झिंटाचा किंग्ज इलेव्हन पंजाब संघ रवाना होतानाचे काही फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यात आले आहेत. अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा राजस्थान रॉयल्स संघदेखील युएईसाठी सज्ज आहे. राजस्थान रॉयल्स संघाने ‘युएई रेडी’ असे फोटो पोस्ट केले आहेत. पाठोपाठ RCBच्या संघानेदेखील आपल्या खेळाडूंची विशेष अशी काळजी घेतली आहे. बंगळुरूचा संघदेखील लवकरच युएईसाठी प्रयाण करणार आहे. याचदरम्यान, BCCIने IPL 2020 साठी युएईला जाणाऱ्या खेळाडूंना आणि संघमालकांना ‘वॉर्निंग’ दिली आहे.