करोना विषाणूमुळे २०२० वर्ष क्रीडा प्रेमींसाठी निराशाजनक होते. बर्‍याच मोठ्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या, तर काही स्थगित करण्यात आल्या. क्रिकेटचा टी-२० वर्ल्डकप आणि ऑलिम्पिकही पुढे ढकलण्यात आले. यूएस ओपनपासून इतर अनेक स्पर्धा रद्द करण्यात आल्या. दरम्यान, आता ऑलिम्पिक पुन्हा सुरू होणार असून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) भारताकडून यात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो येथे २३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान खेळल्या जाणार आहेत.

टोकियोला जाणाऱ्या खेळाडूंना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) १० कोटींची आर्थिक मदत मिळणार आहे. रविवारी (२० जून) अ‍ॅपेक्स काऊन्सिलच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बीसीसीआयला या दिवसात क्रिकेट दिनदर्शिकेत कोणतीही सवलत द्यायची इच्छा नाही. सध्या भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. याखेरीज आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांची मालिका खेळण्यासाठी जाणार आहे.

हेही वाचा – ‘‘सांप को पाल रहा था..!”, पंत स्वस्तात बाद झाल्यानंतर लोकांनी शेअर केले भन्नाट मीम्स

विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ कसोटी मालिकेत इंग्लंडला आव्हान देईल. तर शिखर धवनच्या नेतृत्वाखालील मर्यादित षटकांचा संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने आणि तीन टी-२० मालिका खेळेल. याशिवाय बीसीसीआय आयपीएलचीही तयारी करत आहे. आयपीएलचे उर्वरित सामने यूएईमध्ये आयोजित केले जातील. आयपीएलमध्ये प्लेऑफ आणि अंतिम सामन्यासह एकूण ३१ सामने खेळले जाणार आहेत. करोना विषाणूमुळे भारतामध्ये सुरू झालेली ही लीग मध्यातच पुढे ढकलण्यात आली.