‘डीसिझन रिव्ह्णू सिस्टिम’च्या (डीआरएस) सार्वत्रिक अंमलबजावणीला भारताचा विरोध यापुढेही चालू राहणार आहे. लंडनमध्ये होणाऱ्या आयसीसीच्या वार्षिक बैठकीत बीसीसीआय आपला ‘डीआरएस’विरोधी सूरच आळवणार आहे, असे बीसीसीआयचे सचिव संजय पटेल यांनी सांगितले.
‘‘डीआरएसच्या अंमलबजावणीसाठी अनुकूल होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भारताचे आधीपासूनच धोरण स्पष्ट आहे. कसोटी मालिकेमध्ये डीआरएसच्या वापराला आमचा विरोध आहे. लंडनमध्ये होणाऱ्या बैठकीतही आमची भूमिका कायम असेल,’’ असे पटेल यांनी सांगितले. वार्षिक बैठकीदरम्यान विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांसाठीसुद्धा होणाऱ्या बैठकीला पटेल हजर राहणार आहेत.
‘‘डीआरएसला विरोध करण्याचा बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत सर्वसंमतीने निर्णय घेण्यात आला आहे. कारण आमचा या प्रणालीवर पूर्ण विश्वास नाही,’’ असे पटेल यांनी सांगितले.
रवी सवानी आयोगाच्या अहवालाबाबत पटेल म्हणाले की, ‘‘पुढील आठवडय़ात एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि सिद्धार्थ त्रिवेदी यांना सवानी यांच्यासमोर हजर राहावे लागणार आहे. यावेळी हे तिघे जण आपली बाजू मांडली. त्यानंतरच सवानी आपला अहवाल बीसीसीआयच्या शिस्तपालन समितीकडे सुपूर्द करतील.’’