महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात पुनरागमन कधी करणार हा प्रश्न गेले काही दिवस देशातील क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे. २०१९ मध्ये विश्वचषकात भारताचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. या स्पर्धेत धोनी आपल्या संथ फलंदाजीमुळे टिकेचा धनी बनला होता. यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत धोनीने विश्रांती घेणं पसंत केलं होतं. डिसेंबर महिन्यात घरच्या मैदानावर विंडीजविरुद्ध मालिकेत धोनी भारतीय संघात पुनरागमन करेल अशी चर्चा होती, मात्र ‘मुंबई मिरर’ वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार निवड समिती आता धोनीला भारतीय संघात स्थान देण्याच्या मनस्थितीत नाहीये.

धोनीला भारतीय संघात जागा हवी असल्यास त्याला निवृत्तीच्या मालिकेत जागा दिली जाईल. त्याशिवाय धोनीला आता भारतीय संघात जागा मिळणं अशक्य असल्याचं निवड समितीतल्या सुत्रांनी सांगितलं आहे. क्रिकेटपासून दूर राहिलेल्या धोनीने मध्यंतरीच्या काळात दोन महिने भारतीय लष्करात काम केलं. याचसोबत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे झालेल्या कसोटी सामन्यातही धोनी मैदानात हजर होता.

महेंद्रसिंह धोनीच्या अनुपस्थितीत निवड समितीने मर्यादीत षटकांच्या सामन्यासाठी ऋषभ पंतला स्थान दिलं. मात्र फलंदाजीत ऋषभ पंतची कामगिरी अतिशय निराशाजनक झाल्याने, आगामी बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी संजू सॅमसनलाही संधी देण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेतही पंतला विश्रांती देऊन साहाला संधी देण्यात आली होती. त्यामुळे आगामी काळात धोनी आपल्या निवृत्तीचा निर्णय कधी घेतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.