भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची स्पष्टोक्ती; झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघ सज्ज

माझ्या भवितव्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) घेईल, अशी स्पष्टोक्ती भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिली. मी खेळाचा आनंद लुटत नाही, असे तर नाही. त्यामुळे हा निर्णय मी घेऊ शकणार नाही, असे धोनीने पत्रकार परिषदेत सांगितले. भारतीय संघ ११ जूनपासून सुरू होणाऱ्या झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मुंबईतून प्रयाण करणार आहे.

भारताचे माजी संचालक रवी शास्त्री यांनी नुकत्याच एका मुलाखतीत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात यावेत, अशी सूचना केली होती. धोनीला कर्णधारपदापासून मुक्त करून खेळाचा यथेच्छ आनंद लुटू द्यावा, असे शास्त्री म्हणाले होते. या संदर्भात धोनीने ही प्रतिक्रिया दिली. धोनीने कसोटी क्रिकेटला जरी अलविदा केला असला तरी एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामने तो खेळत आहे.

भारताच्या प्रशिक्षकाविषयी अपेक्षा व्यक्त करताना धोनी म्हणाला की, बीसीसीआयच्या जाहिरातीनुसार त्याचे हिंदी फारसे चांगले नसले तरी त्याला देशातील संस्कृतीची जाण असावी.

‘‘संवाद ही फार मोठी समस्या नाही. नव्या खेळाडूंच्या दृष्टीने इंग्रजी ही फार मोठी अडचण नाही. हिंदी बोलता यायला हवे, ही फक्त अपेक्षा नसावी. सर्वोत्तम प्रशिक्षकाची निवड होईल. संस्कृतीची जाण ही इंग्रजी आणि हिंदी भाषेपेक्षा जास्त महत्त्वाची आहे,’’ असे धोनीने सांगितले.

‘‘नव्या खेळाडूंसोबत खेळण्याचा अनुभव हा वेगळाच असेल. नेहमी ज्या खेळाडूंसोबत खेळतो त्या वेळी प्रत्येकाला आपली भूमिका आणि जबाबदारीची जाणीव असते. आगामी मालिकेत बऱ्याच खेळाडूंसोबत मी प्रथमच खेळणार आहे,’’ असे धोनीने सांगितले.

विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन आणि रविचंद्रन अश्विन यांच्यासारख्या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत दुसऱ्या फळीतील खेळाडूंचा झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

‘‘भारतीय संघाचा योग्य समतोल साधून सर्वोत्तम ताकदीनिशी प्रतिस्पध्र्याचा मुकाबला करणे हे आव्हान समोर असेल,’’ असे तो पुढे म्हणाला.

‘‘आयपीएल हे असे व्यासपीठ आहे, की जिथे गुणवत्तेचा शोध घेता येतो. स्थानिक क्रिकेटचाच तो एक भाग आहे, तरी त्याला वेगळे महत्त्व आहे. आंतरराष्ट्रीय खेळाडूंसोबत खेळायची संधी येथे मिळते.