भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) कार्यकारिणी समितीची महत्त्वपूर्ण बैठक पुढील आठवडय़ात होणार आहे. मात्र या बैठकीत इंग्लंड आणि पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेतील भारताच्या सुमार कामगिरीची कारणमीमांसा केली जाणार की नाही, याबाबत काहीही समजू शकले नाही.
‘‘बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक १५ जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमवरील क्रिकेट सेंटरमध्ये होणार आहे. ही नियमित बैठक आहे,’’ असे बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितले. भारताच्या खराब कामगिरीबाबत भारतीय संघाचे प्रशिक्षक डंकन फ्लेचर आणि सपोर्ट स्टाफला या बैठकीत जाब विचारला जाईल, अशी चर्चा आहे. पण फ्लेचरसहित अन्य सपोर्ट स्टाफचा करार वाढवण्याबाबत या बैठकीत चर्चा होईल की नाही, हे समजू शकले नाही.
बीसीसीआयने भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनवरील घातलेली बंदी उठवण्याचे आदेश आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने दिले होते. पण २१ नोव्हेंबरला झालेल्या गेल्या बैठकीत अझरुद्दीनबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. ‘‘अझरुद्दीनच्या भवितव्याबाबतचा निर्णय बीसीसीआयने लांबणीवर टाकला आहे. बीसीसीआयचे कायदेशीर तज्ज्ञ या प्रकरणाचा अभ्यास करत असून ते अंतिम निष्कर्षांपर्यंत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे अझरुद्दीनबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात दाद मागायची की नाही, याचा फैसला कार्यकारिणी समिती सध्या घेऊ शकत नाही,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.