आयपीएलच्या बाराव्या हंगामाचा लिलाव काही दिवसांपूर्वी जयपूर शहरात पार पडला. मात्र 2019 साली भारतात होणाऱ्या निवडणुकांमुळे स्पर्धेचं आयोजन भारतात करायचं की भारताबाहेर यावर अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाहीये. काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार आयपीएल दक्षिण आफ्रिका किंवा युएईमध्ये खेळवण्यात येणार असल्याचा विचार समोर आला होता. याआधीही 2009 साली निवडणुकांमुळे आयपीएल दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात आली होती. याचसोबत 2014 साली स्पर्धेचे काही सामने युएईमध्ये खेळवण्यात आले होते.

निवडणुकांच्या तारखा अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नसल्यामुळे, बीसीसीआय सध्या चिंतेत आहे. मात्र, Economic Times वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सध्या बीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीच आयोजनाबद्दल 4 प्रमुख पर्यायांवर विचार करत असल्याचं कळतंय.

1) संपूर्ण स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळवणं
2) संपूर्ण स्पर्धा युएईमध्ये खेळवणं
3) स्पर्धा भारतामध्येच खेळवणं, मात्र आयोजन छोट्या शहरांमध्ये करणं
4) सर्व संघ एकत्र प्रवास करतील अशा Carvan पद्धतीने स्पर्धेचं आयोजन करणं

आयपीएलच्या प्रसारणाचे हक्क असलेल्या Star Sports समुहानेही स्पर्धा भारतातच खेळवण्याकडे आपला भर दिलाय. स्पर्धा देशाबाहेर खेळवल्यास प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद याबद्दल Star Sports समुह साशंक आहे. मात्र, स्पर्धेचं आयोजन भारतात केल्यास, संघांच्या सुरक्षिततेपासून अन्य सर्वच गोष्टींचं आयोजन बीसीसीआयला करावं लागणार आहे. त्यामुळे यावर बीसीसीआय काय निर्णय घेतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.