‘बीसीसीआय’चा भारतीय क्रिकेट संघाच्या गणवेशासाठी नायके कंपनीशी असलेला करार सप्टेंबर अखेरीस संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. मात्र नव्या करारात ‘बीसीसीआय’ला गणवेश हक्कांचा सौदा स्वस्तात करावा लागण्याची चिन्हे आहेत.

‘बीसीसीआय’ आणि नायकेमधील चार वर्षांचा करार २०१६पासून सुरू झाला. त्याआधी १० वर्षे भारतीय क्रिकेटच्या गणवेशासाठी करारबद्ध असलेल्या नायकेने नव्या करारात प्रत्येक सामन्यापोटी ८८ लाख रुपये देण्याचे निश्चित केले. याचप्रमाणे चार वर्षांच्या कालावधीतील जवळपास एकूण २२० सामन्यांआधारे प्रत्येक वर्षांला सहा कोटी रुपये देण्याची हमी दिली. याच करारान्वये स्वामित्व हक्क आणि अन्य मार्गे आठ ते १० कोटी रुपयांचीही तरतूद होती. परंतु सध्या करोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक परिस्थितीत बोधचिन्ह कराराच्या प्रस्तावातील पायाभूत किंमत ३१ टक्क्यांनी खालावण्याची शक्यता आहे. त्यामुळे नायकेच्या करारातील किमान हमीची अट बाजूला ठेवावी लागणार आहे. ‘बीसीसीआय’च्या नव्या गणवेश प्रस्तावात पायाभूत किंमत ६१ लाख रुपये असण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारे (आयसीसी) २०२३पर्यंतची कार्यक्रमपत्रिका निश्चित केल्याने नवा प्रस्तावित करार तीन वर्षांचा असेल.