राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेसह सहा महिने काम करण्यास राजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी उत्तेजकांविरोधात कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने ठोस पावले उचलली आहेत. राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेसोबत (नाडा) सहा महिने काम करून बीसीसीआय यापूर्वी जागतिक उत्तेजक विरोधी मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करण्याच्या चूकीवर पडदा घालणार आहे.

बीसीसीआयचे अधिकारी आणि प्रशासकीय समितीचे सदस्य यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी सोमवारी चर्चा करून हा निर्णय घेतला. ‘‘आयसीसी, बीसीसीआय व ‘नाडा’ पुढील सहा महिने उत्तेजक प्रतिबंधकांविरोधात एकत्रितपणे काम करणार असून यामध्ये नोंदणी केलेल्या खेळाडूंना ‘नाडा’च्या उत्तेजक चाचणी प्रयोगशाळेत चाचणीसाठी नेण्यात येईल,’’ असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवरून सांगितले.

दरम्यान, ‘नाडा’चे संचालक नवीन अगरवाल यांनी यासंदर्भात आपल्याला काहीही सूचित केले नसल्याचे म्हटले आहे. ‘‘मला उत्तेजक प्रतिबंधक चाचणीसंदर्भात बीसीसीआयकडून लेखी स्वरूपात अधिकृतपणे सूचना आल्याशिवाय मी यासंबंधी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही,’’ असे अगरवाल म्हणाले.