आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सने प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान जवळपास निश्चीत केलं आहे. सूर्यकुमार यादवच्या नाबाद ७९ धावांच्या खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने RCB वर ५ गडी राखून मात केली. सूर्यकुमारची ही अर्धशतकी खेळी, BCCI च्या निवड समितीसाठी एक चपराक मानली जात आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानिक आणि आयपीएलमध्ये सातत्याने धावा काढूनही सूर्यकुमारला भारतीय संघात स्थान मिळत नाहीये. यंदाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वन-डे संघात सूर्यकुमारला संधी मिळेल असं वाटत होतं. परंतू तिकडेही त्याच्या पदरी निराशाच आली.

परंतू यामुळे निराश न होता सूर्यकुमारने RCB विरुद्ध सामन्यात संघाला गरज असताना अर्धशतकी खेळी केली. त्याच्या या खेळीवर भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री देखील चांगलेच प्रभावित झाले आहेत. सूर्यनमस्कार, असाच खेळत रहा आणि संयम ठेव असं सूचक ट्विट करत रवी शास्त्रींनी सूर्यकुमारला लवकरच त्यालाही भारतीय संघात संधी मिळेल असं सांगितलंय.

एकीकडे मुंबईचे फलंदाज माघारी परतत असताना सूर्यकुमारने एक बाजू लावून धरली. आपल्या अर्धशतकी खेळीत सूर्यकुमारने १० चौकार आणि ३ षटकार लगावले. RCB कडून मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २-२ तर ख्रिस मॉरिसने १ बळी घेतला. परंतू मुंबईच्या फलंदाजांवर अंकुश लावण्यात ते अपयशी ठरले.