इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर ५ फेब्रुवारीपासून क्रिकेट सामने खेळणार आहे. यात चार कसोटी सामन्यांची मालिका, पाच ट्वेन्टी-२० सामन्यांची मालिका आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेचा समावेश आहे. दौरा सुरु होण्याापूर्वी इंग्लंडचा महान फिरकी गोलंदाज ग्रॅमी स्वान यानं भारतातील विजायचं गुपीत सांगितलं आहे. स्वान यानं इंग्लंडच्या संघाला सल्ला देताना भारताचा पराभव कसा करायचा हेही सांगितलं.

‘‘इंग्लंड संघाने मागील चुकांमधून धडे घ्यायला हवेत. २०१२च्या भारत दौऱ्यावर पीटरसनने फिरकीचा अप्रतिम उपयोग करून ते यश मिळवले होते. त्याचा योग्य अभ्यास केल्यास इंग्लंडला भारत दौरा यशस्वी करता येऊ शकेल. पीटरसनने फिरकीविरुद्ध खेळण्याचा इंग्लंडचा दृष्टिकोन बदलला. तो अतिआक्रमक कर्णधार होता. तसेच तंत्रशुद्ध फलंदाजी हे त्याचे वैशिष्टय़ होते,’’ असा सल्ला स्वान यानं भारतात येणाऱ्या इंग्लडच्या संघाला दिला आहे. ४१ वर्षीय ऑफ-स्पिनर स्वानने २००८ ते २०१३ या कालावधीतील ६० कसोटी सामन्यांत २५५ बळी मिळवले आहेत.

‘‘ऑस्ट्रेलियाचा संघ आता जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघ म्हणून गणला जाऊ शकत नाही. ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाला इंग्लंडने नमवल्यास ते अ‍ॅशेस विजयापेक्षाही महत्त्वाचे ठरेल. अ‍ॅशेस मालिकेची उत्कंठा आता इतिहासजमा झाली आहे. भारताला त्यांच्या देशात नमवणे, हे कौतुकास्पद यश असेल. २०१२मध्ये आम्ही भारताला त्यांच्या देशात नमवण्याची किमया साधली होती. तेव्हापासून मायदेशात ते अपराजित राहिले आहेत. त्यामुळे यशाची पुनरावृत्ती हेच इंग्लंडपुढील आव्हान असेल,’’ असेही स्वान म्हणाला.

पहिल्या कसोटी सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली अनुपलब्ध असतानाही भारताने ऑस्ट्रेलियावर वर्चस्वपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे स्वान यांनी भारतीय संघाचेही कौतुक केले आहे. ‘‘जागतिक क्रिकेटमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा संघ तेवढा बलाढय़ संघ मानला जात नाही. त्यामुळे इंग्लंडच्या संघाला अ‍ॅशेस मालिकेपेक्षा भारताविरुद्धच्या सामन्यांची उत्सुकता असते,’’ असे स्वान म्हणाले.