आयपीएलचा अकरावा हंगाम सुरु होण्याआधी भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधवने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्व गुणांचं कौतुक केलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर माझा खेळ सुधारण्यात महेंद्रसिंह धोनीचा मोठा वाटा असल्याचं केदारने चेन्नई सुपर किंग्जच्या अधिकृत संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. यंदाच्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने केदार जाधवला ७ कोटी ८० लाखांची बोली लावत आपल्या संघात विकत घेतलं आहे. स्पॉट फिक्सींग प्रकरणात दोन वर्षांच्या बंदीची शिक्षा भोगून झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्ज नवीन हंगामात पुनरागमन करत आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018: गौतम गंभीर ७ वर्षांनंतर पुन्हा दिल्ली डेअरडेविल्सचा कर्णधार

“धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना माझ्या खेळात कमालीचा बदल झाला आहे. मी काही वर्षांपूर्वी भारतासाठी क्रिकेट खेळेन याची आशाच सोडली होती. मात्र धोनीने मला आत्मविश्वास देऊन गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला, वेळोवेळी यष्टींमागून तो मला मार्गदर्शनही करायचा, यामुळेच मी बळी मिळवू शकलो.” धोनीच्या नेतृत्वाचं कौतुक करताना केदार जाधव बोलत होता.

अवश्य वाचा – IPL 2018 – आयपीएलच्या स्वागत सोहळ्याच्या तारखेत बदल, प्रशासकीय समितीकडून खर्चात कपात

आतापर्यंत केदार जाधवने ४० वन-डे सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व केलं असून त्याच्या खात्यातवर ७९८ धावा जमा आहेत. याचसोबत आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजाची भंबेरी उडवत केदारने आतापर्यंत १६ फलंदाजांनाही बाद केलं आहे. आयपीएलमध्ये केदार जाधववर याआधी फारवेळा गोलंदाजी करण्याची वेळ आलेली नसली तरीही फलंदाजीत त्याने आपली चमक दाखवलेली आहे. आयपीएलमध्ये केदार जाधवच्या नावावर ८९३ धावा जमा आहेत.

अवश्य वाचा – IPL 2018 – व्यंकटेश प्रसाद किंग्ज इलेव्हन पंजाबच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्त