News Flash

आठवडय़ाची मुलाखत: तडजोडीमुळेच कारकीर्द घडत आहे !

अनेक महिने घरापासून दूर राहणे खूप जड जाते, मात्र कारकिर्दीत काही मिळवायचे असेल तर अशी तडजोड करणे अपरिहार्य आहे. हे आव्हान मनापासूनच स्वीकारल्यामुळे माझी अ‍ॅथलेटिक्स

| July 8, 2013 05:47 am

अनेक महिने घरापासून दूर राहणे खूप जड जाते, मात्र कारकिर्दीत काही मिळवायचे असेल तर अशी तडजोड करणे अपरिहार्य आहे. हे आव्हान मनापासूनच स्वीकारल्यामुळे माझी अ‍ॅथलेटिक्स कारकीर्द घडली आहे, हे सांगताना भारताची आंतरराष्ट्रीय धावपटू सुधा सिंगच्या डोळ्यांसमोर आपला भूतकाळ उभा राहिला. आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि आशियाई मैदानी स्पर्धामध्ये सुधा हिने आजपर्यंत पदकांची लयलूट केली आहे. उत्तर प्रदेशमधील बरेली येथे राहणाऱ्या या २७ वर्षीय खेळाडूने आपल्या आजपर्यंतच्या कारकिर्दीविषयी आणि भावी ध्येयांविषयी केलेली बातचीत-
तुझे घर बरेलीत आहे आणि तू मुंबईत नोकरी सांभाळून खेळातील कारकीर्द जोपासत आहेस. घर आणि खेळ हा समतोल कसा साधतेस?
तो मोठा यक्षप्रश्न आहे. मुंबईत मी मध्य रेल्वेत नोकरी करीत आहे. मात्र स्पर्धासाठी सरावाकरिता जास्त काळ बंगळुरू येथेच जावे लागते. रेल्वेकडून मला भरपूर सुविधा व सवलती मिळत आहेत. त्यामुळे अडचण येत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदकांच्या कमाईबरोबरच मला नोकरीत बढती मिळते, तसेच विशेष पारितोषिके मिळतात. मुंबईत असले तरी मला सरावाकरिताही सवलत मिळते.
घरापासून लांब असल्याचे दु:ख वाटत नाही का?
हो, घरापासून लांब राहत असल्याचे मोठे दु:ख वाटते. मात्र गेली पाच-सहा वर्षे मी मुंबईत राहिल्यामुळे या गोष्टींची मला सवय झाली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांमध्ये मी घरी गेलेली नाही. माझे घरचेच लोक येथे येऊन मला भेटतात. बरेच महिने सरावासाठी बंगळुरूला असले तरी ते तेथेही येऊन माझी विचारपूस करतात. त्यामुळे माझ्यावरील दडपण हलके होते व माझा आत्मविश्वास वाढतो.
कारकीर्द घडविताना घरच्या लोकांचे कसे प्रोत्साहन मिळाले आहे?
माझे वडील टेलिफोन खात्यात नोकरी करीत होते. नुकतेच ते निवृत्त झाले आहेत. ऑलिम्पिकमध्ये मी पदक मिळवावे हे त्यांचे स्वप्न आहे. त्यामुळेच प्रथमपासून मला पालकांचा शंभर टक्के पाठिंबा व प्रोत्साहन लाभले आहे. मला आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी त्यांनी भरघोस आर्थिक पाठबळ दिले आहे.
आशियाई मैदानी स्पर्धेत सुवर्णपदक हुकल्याची खंत वाटत आहे काय?
अर्थातच, कारण या शर्यतीत सोनेरी यशाची मला खात्री होती. शर्यतीसाठी आम्ही तयार झालो होतो; मात्र आमच्या शर्यतीपूर्वी असलेली १०० मीटरची शर्यत चुकांमुळे खूप लांबली. त्यामुळे आमची शर्यत सुरू होण्यास २० मिनिटे विलंब झाला. तोपर्यंत शरीर कडक झाले होते. सुरुवातीस आघाडी घेऊनही मला अव्वल यश मिळविता आले नाही. चेन्नईत आंतर-राज्य स्पर्धेत सुवर्णपदक मिळविताना दिलेल्या वेळेपेक्षा जास्त वेळ मला येथे लागला.
ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कशी तयारी करीत आहेस?
रिओ येथे २०१६मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धापूर्वी आशियाई क्रीडा स्पर्धा व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या दोन्ही स्पर्धा ऑलिम्पिकची रंगीत तालीम असणार आहेत. अर्थात आतापासूनच मी या स्पर्धाच्या सरावाचे नियोजन करीत आहे. दररोज सकाळी तीन तास व सायंकाळी तीन तास असा माझा सराव सुरू असतो. त्यामध्ये स्पर्धात्मक सरावाबरोबरच व्यायाम, योगा, वजन कसरती आदी पूरक सरावही सुरू असतो. ४०० मीटर अंतरापासून ४ किलोमीटर अंतरापर्यंत धावण्याचा आम्ही सराव करीत असतो.
स्टीपलचेसकरिता काही विशेष सराव करावा लागतो काय?
या शर्यतीमध्ये पाण्याचा अडथळा तसेच अडथळा शर्यतीचा समावेश असतो. तरीही आमच्या रोजच्या सरावात पाण्याच्या अडथळ्याचा समावेश नसतो. प्रत्यक्ष स्पर्धेच्या वेळी आम्ही अगोदर सरावाच्या ट्रॅकवर त्याचा सराव करतो. एवढा सराव पुरेसा होतो.
तू बरेली येथील रहिवासी, नोकरी मुंबईत व सराव बंगळुरू अशा विभिन्न वातावरणात भोजनाचे तंत्र कसे सांभाळत असतेस?
मी जे. एस. भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत असल्यामुळे माझ्या शर्यतीकरिता जो योग्य आहार लागतो, तसाच आहार मी घेते. सुदैवाने आजपर्यंत कोठेही गेले तरी मला पोषक आहाराबाबत समस्या जाणविलेली नाही.
कारकिर्दीतील मुख्य ध्येय काय आहे?
ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला पदक मिळवून देण्याचेच माझे मुख्य ध्येय आहे आणि २०१६मध्ये मी ते साकार करीन, अशी मला खात्री आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 5:47 am

Web Title: because of nigoshiasion career happens
Next Stories
1 न्यूझीलंड क्रिकेटतर्फे सहा नव्या खेळाडूंना वार्षिक करार
2 बीसीसीआयने रवींद्र जडेजाला फटकारले
3 हिप हिप मरे! तब्बल ७७ वर्षांनंतर विम्बल्डनवर ‘ब्रिटिशराज’
Just Now!
X