भारत हा क्रिकेटवेड्यांचा देश मानला जातो. भारतीय संघाचा कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरुद्ध सामना असो, भारतीय चाहते आपलं सर्व काम सोडून टीव्हीसमोर सामने पाहत बसतात. याच कारणामुळे भारतात इतर खेळांना हवीतशी प्रसिद्धी मिळत नसल्याची ओरड नेहमी केली जाते. मात्र २०१४ साली आलेल्या प्रो-कबड्डी लिगने देशातल्या क्रीडाप्रेमींसाठी आणखी एक खजिना समोर आणला. सध्या या स्पर्धेचं पाचवं वर्ष सुरु आहे आणि अल्पावधीतच कबड्डी हा क्रिकेटनंतर पाहिला जाणारा देशातील दुसऱ्या क्रमांकाचा खेळ ठरला आहे.

या कारणांमुळे प्रो-कबड्डीचा खेळ भारतीयांच्या पसंतीस उतरला आहे –

१) प्रो-कबड्डी अवघ्या ४० मिनिटांचा खेळ आहे. झटपट लागणारा निकाल आणि सामन्यांमधला थरार या कारणांमुळे प्रेक्षक ४० मिनिटं टीव्हीसमोरुन हलत नाही.

२) प्रो-कबड्डीचे नियम हे या स्पर्धेची आणखी एक जमेची बाजू. चढाईच्या वेळी प्रत्येक खेळाडूला तिसऱ्या चढाईत गुणांची कमाई करावीच लागते. सलग ३ चढायांमध्ये गुण न मिळवल्यास खेळाडू बाद ठरवला जातो. कबड्डीव्यतिरिक्त कोणत्याही खेळामध्ये अशा प्रकारचा ‘करो या मरो’ सारखा नियम नाही.

३) एखाद्या संघाचे २ किंवा ३ खेळाडू मॅटवर असतानाही त्यांनी प्रतिस्पर्धी संघाची पकड केल्यास त्यांना ‘सुपर टॅकल’चा एक गुण जादा मिळतो. यामुळे खेळातला थरार आणखी वाढतो.

४) प्रत्यक्ष सामन्यात होणारे बदल ही प्रो-कबड्डीची आणखी एक जमेची बाजू. सुपर १०, हाई फाईव्ह यासारख्या टर्म्समुळे खेळाडूही जीव तोडून खेळतात.

५) प्रक्षेपण करणाऱ्या स्टार स्पोर्ट्स या वाहिनीचाही प्रो-कबड्डीच्या यशात मोठा सहभाग. ‘कबड्डी ज्युनियर’ सारख्या उपक्रमातून प्रत्येक शहरातील शाळांमधली मुलांना या स्पर्धेत सहभाग घेता येतो.

६) सामना आपल्या हातात आलेला असताना खेळाची गती कमी करणे, रिकामी चढाई करणे यासारख्या प्रकारांमुळे प्रेक्षकांनाही कबड्डीत स्वारस्य वाटायला लागलं आहे.

क्रिकेटव्यतिरीक्त अन्य खेळांच्या प्रक्षेपणाला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला, मात्र आपला प्रेक्षकवर्ग त्यांना टीकवता आला नाही. मात्र गेले ५ हंगाम प्रो-कबड्डीने आपला प्रेक्षकवर्ग टीकवून ठेवला असून, दिवसेंदिवस कबड्डीच्या चाहत्यांमध्ये वाढ होताना दिसतेय. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अवघ्या ४० मिनीटांमध्ये या खेळाचा निकाल समोर येत असल्यामुळे देशातली तरुण पिढी या प्रकाराकडे अधिक आकर्षीत होताना दिसते आहे.