बंगळूरु : दूरचित्रवाणीवरील एका कार्यक्रमात महिलांबद्दल अश्लील शेरेबाजी केल्यामुळे भारताचा सलामीवीर लोकेश राहुल वादात सापडला होता. मात्र या वादविवादामुळे मला अधिक परिपक्व होण्याची संधी मिळाली. तसेच भारतीय संघातून खेळणे किती मोलाचे आहे, याची किंमत उमगली, अशा शब्दांत राहुलने आपल्या भावना व्यक्त केल्या.

या वादानंतर बंदीची शिक्षा भोगलेल्या राहुलला भारतीय कसोटी संघातील स्थानही गमवावे लागले होते. त्यानंतर भारत-अ संघाकडून चमकदार कामगिरी करत त्याने राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. तो म्हणाला, ‘‘तो माझ्यासाठी अत्यंत खडतर काळ होता. प्रत्येक व्यक्तीला, खेळाडूला कठीण प्रसंगातून जावे लागते. मात्र ही माझी वेळ होती. या काळात मी माझ्या खेळात सुधारणा करण्यावर भर दिला. या प्रसंगामुळे मी अधिक नम्र झालो आहे. देशातर्फे पुन्हा एकदा खेळण्याची संधी मिळाली असून मी त्याचा आदर करतो.’’

‘‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून वेळ मिळाल्यानंतर भारतात आल्यावर मी कुठे कमी पडतोय, याचे निरीक्षण केले. सुदैवाने मला भारत-अ संघात खेळण्याची संधी मिळाली. तिथे खेळताना दडपण कमी असल्यामुळे मला माझ्या कौशल्यावर तसेच तांत्रिक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी वेळ मिळाला. भारत-अ संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविडसोबत मौल्यवान वेळ घालवून माझ्या खेळातील उणिवांवर काम करता आले. पुन्हा एकदा भारतीय संघात पुनरागमन करताना माझ्यावर काहीसे दडपण होते. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत माझ्या बॅटमधून धावा निघाल्याने मी आनंदी आहे,’’ असेही त्याने सांगितले.