जानेवारी महिना हा जगभरातील क्रीडाप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे. भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासोबतच U-19 विश्वचषकाला न्यूझीलंडमध्ये सुरुवात होणार आहे. मुंबईकर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली यंदा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे, काल भारताच्या सिनीअर संघासोबत पृथ्वी शॉचा U-19 भारतीय संघ न्यूझीलंडसाठी रवाना झाला. त्याआधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने U-19 संघाची भेट घेत त्यांना विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्या.

या भेटीदरम्यान विराट कोहलीने भारतीय संघाचा युवा कर्णधार पृथ्वी शॉचं कौतुक केलं. “पृथ्वी शॉचा खेळ पाहण्यासाठी मी स्वतः खूप उत्सुक आहे. रवी शास्त्रींकडून मी पृथ्वी शॉच्या खेळाबद्दल खूप ऐकलं आहे. इतक्या कमी वयात पृथ्वीने रणजी क्रिकेटमध्ये केलेली कामगिरी ही अविश्वसनीय आहे. त्याच्या याच कामगिरीमुळे इतर खेळाडूऐवजी त्याला भारतीय संघाचं नेतृत्व देण्यात आलंय.” त्यामुळे यंदा भारतीय संघ पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली चांगली कामगिरी करेल असा मला आत्मविश्वास असल्याचं कोहली म्हणाला.

अवश्य वाचा – भारतीय ‘अ’ संघातील खेळाडूंचे भविष्य उज्वल

१३ जानेवारीपासून U-19 विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २००८ साली विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताच्या U-19 संघाने विश्वचषकावर नाव कोरलं होतं. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत पृथ्वी शॉचा भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असेल.

अवश्य वाचा – विराट कोहलीकडून U-19 विश्वचषकासाठी भारतीय संघाला कानमंत्र