उदयोन्मुख खेळाडूंना निवड समितीचे लक्ष वेधण्याची संधी

ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय सराव सामन्याकडे दोन्ही संघ स्वतंत्र दृष्टिकोनातून पाहात आहेत. ट्वेन्टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी ही रंगीत तालीम करून घेत आहे. तर भारतीय क्रिकेटमध्ये स्थान मिळवण्याचे स्वप्न पाहणारे उदयोन्मुख खेळाडू अध्यक्षीय संघातून आफ्रिकन परीक्षेला सामोरे जात आहेत. भारतीय कसोटी संघातील चेतेश्वर पुजारा आणि के. एल. राहुल यांनाही आफ्रिकन आक्रमणाची अनुभूती घेता येणार आहे.
भारत-दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेला ५ नोव्हेंबरपासून प्रारंभ होत आहे. या पाश्र्वभूमीवर ब्रेबॉर्नला होणाऱ्या सराव सामन्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. दिल्लीचा सलामीवीर उन्मुक्त चंद, कर्नाटकचा फलंदाज करुण नायर, मुंबई मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. या सराव सामन्यात आफ्रिकेच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासाने सामना करून निवड समितीचे लक्ष वेधण्याचा त्यांचा इरादा असेल.
भारतीय कसोटी संघाचा यष्टीरक्षक वृद्धिमान साहानंतर क्रमांक लागणारा नमन ओझालाही आपली कामगिरी दाखवण्याची ही नामी संधी असेल. याशिवाय राजस्थानचा युवा वेगवान गोलंदाज नथू सिंग, मुंबईचा मध्यमगती गोलंदाज शार्दूल ठाकूर, फिरकी गोलंदाज कर्ण शर्मा, जयंत यादव आणि कुलदीप यादव अशी अध्यक्षीय संघाची गोलंदाजीची फळी आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघातील बहुतांशी खेळाडूंचा कसोटी संघातही समावेश असल्यामुळे त्यांनी भारतातील वातावरणाशी चांगले जुळवून घेतले आहे. मात्र वेगवान गोलंदाज व्हर्नन फिलँडर, यष्टीरक्षक डेन व्हिलास यांना मात्र या सामन्याद्वारे चांगला सराव मिळू शकेल.
दक्षिण आफ्रिकेचा कसोटी कर्णधार हशिम अमला भारतामध्ये धावांसाठी झगडत असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी त्याला सूर गवसणे आवश्यक आहे.

संघ
अध्यक्षीय संघ : चेतेश्वर पुजारा (कर्णधार), के. एल. राहुल, उन्मुक्त चंद, करुण नायर, श्रेयस अय्यर, नमन ओझा, हार्दिक पंडय़ा, जयवंत यादव, कुलदीप यादव, शार्दूल ठाकूर, नथू सिंग, कर्ण शर्मा, शेल्डन जॅक्सन.
दक्षिण आफ्रिका : हशिम अमला (कर्णधार), ए बी डी’व्हिलियर्स (उपकर्णधार), टेंबा बाव्हुमा, जीन-पॉल डय़ुमिनी, फॅफ डू प्लेसिस, डीन एल्गर, सिमॉन हार्मर, इम्रान ताहिर, मॉर्नी मॉर्केल, व्हर्नन फिलँडर, डेन पीड, कॅगिसो रबाडा, डेल स्टेन, स्टियान व्हान झिल, डेन व्हिलास.