बेलारुसच्या एरिना सॅबेलेन्काने एनईसीसी करंडक महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घातली आणि कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. अंतिम फेरीत तिने रशियाच्या व्हिक्टोरिया कामनेस्कायाला ६-३, ६-४ असे हरवले.

डेक्कन जिमखाना क्लब येथे झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात चुरस पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र सॅबेलेन्काने उंचीचा पुरेपूर फायदा घेत व्हिक्टोरियाला फारशी संधी दिली नाही. १७ वर्षीय खेळाडू सॅबेलेन्काचे कारकीर्दीतील २५ हजार डॉलर्स पारितोषिकाच्या स्पर्धेतील पहिलेच विजेतेपद आहे. तिने तीन हजार ९२० डॉलर्सची कमाई केली. तिने यापूर्वी टर्कीमध्ये झालेल्या दहा हजार डॉलर्सच्या स्पर्धेत विजेतेपद मिळवले होते. तिने या सामन्यात फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा उपयोग केला. व्हिक्टोरियाने क्रॉसकोर्ट परतीचे फटके मारले, परंतु तिला सव्‍‌र्हिसवर अपेक्षेइतके नियंत्रण ठेवता आले नाही. तिने केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा सॅबेलेन्काला मिळाला. सॅबेलेन्काने जमिनीलगत सुरेख फटके मारले तसेच तिने बॅकहँड फटक्यांवरही चांगले नियंत्रण राखले होते.

विजेतेपदानंतर सॅबेलेन्का म्हणाली, ‘‘अंतिम फेरीत स्थान मिळविल्यानंतर विजेतेपदाची मला खात्री होती. मी व्हिक्टोरियाविरुद्ध प्रथमच खेळत होते तरीही तिच्या खेळाचा मी बारकाईने अभ्यास केला होता. तिचा कमकुवतपणा कोठे आहे, हे मी पाहिले होते व त्यानुसार माझ्या खेळाचे नियोजन करीत तिला हरवले. २५ हजार डॉलर्सच्या स्पर्धेतील हे पहिलेच अव्वल यश असल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे.’’

स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एनईसीसीचे वरिष्ठ व्यवस्थापक बी.एस.आर. शास्त्री यांच्या हस्ते व डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस अजय गुप्ते यांच्या उपस्थितीत झाला.