यूरो कप २०२० स्पर्धेवर करोनाची टांगती तलवार आहे. त्यामुळे स्पर्धेच्या नियमात बदल करण्यात आले आहेत. या नियमावलींसह स्पर्धेला सुरुवात झाली आहे. मात्र आता दुखापतग्रस्त खेळाडूंमुळे संघाची डोकेदुखी वाढली आहे. बेल्जियमचा स्टार मिडफिल्डर केविन डी ब्रुयने अजूनही दुखापतीतून सावरला नाही. त्यामुळे रशियाविरुध्दच्या सामन्याला तो मुकणार आहे. बेल्जियमचे प्रशिक्षक रॉबर्टो मार्टीनेज यांनी ही माहिती दिली आहे. चॅम्पियन लीग दरम्यान त्याला दुखापत झाली होती. मँचेस्टर सिटी विरुद्ध चेलसी सामन्यात त्याच्या नाक आणि डोळ्याजवळील हाडाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. जखम बरी झाली असली तरी तो दुखापतीतून तो सावरला नसल्याचं प्रशिक्षकांनी सांगितलं. त्यामुळे रशियाविरुद्धच्या सामन्यात खेळणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

रशिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी केविन डी ब्रुयने याने संघात पुनरागमन केलं. मात्र दुखापत होत असल्याने त्याने रशियाविरुद्धचा सामना खेळणार नसल्याचं प्रशिक्षकांना सांगितलं. त्यानंतर प्रशिक्षकांनी हा निर्णय घेतला. “केविनला पुढचे दोन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान तो सरावही करत आहे. तो फिट झाल्यानंतर तो संघासाठी त्याचं योगदान देईल.”, असं प्रशिक्षक रॉबर्टो मार्टीनेज यांनी सांगितलं.

फुटबॉल सामना सुरु असताना मैदानात अचानक पॅराशूट उतरलं, आणि…

यूरो कप २०२० स्पर्धेच्या ‘ब’ गटात बेल्जियम, डेन्मार्क, फिनलँड आणि रशिया या देशांचा समावेश आहे. युरो चषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत रशियासमोर बलाढ्य बेल्जियमचे आव्हान असणार आहे. रशियाविरुद्धच्या याआधीच्या सातही सामन्यांत अपराजित राहणाऱ्या बेल्जियमचे पारडे या सामन्यात जड मानले जात आहे. बेल्जियमने सोमवारी मैत्रीपूर्ण सामन्यात क्रोएशियाचा पराभव केला. इंटर मिलानचा आघाडीवीर रोमेलू लुकाकू याने केलेला गोल बेल्जियमच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरला. रशियाने अलेक्झांडर सोबोलेव्हच्या गोलमुळे बल्गेरियाचे आव्हान १-० असे परतवून लावले. बेल्जियमने सलामीच्या लढतीसाठी लुकाकू, टॉबी अल्डरवेइरेल्ड, यान वेटरेनघेन, थिबाऊट कर्टियस आणि यौरी तिलेमान्स या खेळाडूंना संधी दिली आहे.