News Flash

बेल्जियमविरुद्धचा सामना सर्वोत्तम -मेस्सी

अर्जेटिनाने तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली आणि हा आनंद संघाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीला गगनात मावेनासा झाला आहे.

| July 7, 2014 01:44 am

अर्जेटिनाने तब्बल २४ वर्षांनंतर विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत मजल मारली आणि हा आनंद संघाचा अव्वल खेळाडू लिओनेल मेस्सीला गगनात मावेनासा झाला आहे. मेस्सी आता कारकिर्दीतील पहिलाच विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना खेळणार आहे. बेल्जियमविरुद्धचा सामना हा आतापर्यंतच्या विश्वचषकातील सर्वोत्तम सामना असल्याचे त्याने म्हटले आहे. तथापि, या सामन्यात एकमेव गोल लगावत संघाला विजय मिळवून देणाऱ्या गोंझालो हिग्युएनने या गोलचे ‘सुंदर क्षण’ असे वर्णन केले आहे.
‘‘आम्ही उत्कृष्टपणे सामना खेळलो. आम्हाला बऱ्याच संधीचे सोने करता आले नाही, पण त्यांनाही काही संधीचा फायदा उचलता आला नाही,’’ असे मेस्सीने सांगितले.
आतापर्यंतच्या स्पर्धेतील या सामन्यात अर्जेटिनाने परिपूर्ण खेळ केला का, असा प्रश्न विचारल्यावर मेस्सी म्हणाला की, ‘‘हो, माझ्या मते हा या स्पर्धेतील आमचा सर्वोत्तम सामना होता. या सामन्यात आमचा परिपूर्ण खेळ झाला.’’
अर्जेटिनाने स्पर्धेतील पाचही सामने जिंकले आहेत. साखळी फेरीत अर्जेटिनाने अव्वल स्थान पटकावले होते. त्यानंतर बाद फेरीत त्यांनी स्वित्र्झलडला पराभूत केले, तर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बेल्जियमवर विजय मिळवत तब्बल २४ वर्षांनंतर उपांत्य फेरी गाठली आहे. याबद्दल मेस्सी म्हणाला की, ‘‘हे सारे अद्भुत आहे. आतापर्यंतचा प्रवास नक्कीच सोपा नव्हता. बऱ्याच वर्षांपासून अर्जेटिनाला उपांत्य फेरीपर्यंत पोहोचता आले नव्हते आणि आम्ही देशाला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात यशस्वी ठरलो आहोत.’’
हिग्युएनने आठव्या मिनिटाला गोल करत अर्जेटिनाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. याबद्दल तो म्हणाला की, ‘‘सुदैवाने या सामन्यात मला गोल करता आला. गोल करणे हे आघाडीपटूंचे ध्येय असते आणि ही सुंदर गोष्ट या सामन्यात माझ्याकडून घडली.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:44 am

Web Title: belgium match was excellent messi
Next Stories
1 डी मारियाच्या दुखापतीमुळे अर्जेटिनाला धक्का
2 क्रीडा प्रक्षेपणाचा बहुरंगी बाजार
3 ब्राझील व जर्मनीला समान भाव
Just Now!
X