भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव अवघ्या ११२ धावांवर आटोपला. ‘लोकल बॉय’ फिरकीपटू अक्षर पटेलने सहा बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. सलामीवीर जॅक क्रॉलीचे अर्धशतक वगळता इतर कोणताही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. आपली १००वी कसोटी खेळणाऱ्या इशांत शर्माने इंग्लंडचा सामन्यातील पहिला गडी घेतला, तर अनुभवी रविचंद्रन अश्विनने अक्षरला उत्तम साथ देत तीन बळी टिपले. त्यानंतर भारताच्या फलंदाजीच्या वेळी एक गोष्ट घडली त्यामुळे इंग्लंडच्या संघाला ताकीद देण्यात आली.

Ind vs Eng: …अन् मैदानावर विराटचा जोरदार जल्लोष; पाहा Video

भारताच्या फलंदाजीच्या वेळी बेन स्टोक्स फिल्डिंग करत होता. बेन स्टोक्सकडे चेंडू गेला. त्याने चेंडू आडवला आणि चेंडू परत गोलंदाजाकडे देण्याआधी त्याने सवयीप्रमाणे चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ लावली. पण करोना काळात बदललेल्या नियमांनुसार चेंडूला लाळ लावण्यास मनाई असल्याने बेन स्टोक्सला पंचांनी जवळ बोलावून समज दिली. तसेच, पुन्हा अशी चूक घडल्यास पाच धावांचा दंड संघाला केला जाईल असेही सांगितलं.

Ind vs Eng: …अन् मैदानावर विराटचा जोरदार जल्लोष; पाहा Video

दरम्यान, इंग्लंडचा डाव ११२ धावांवर आटोपल्यावर भारताच्या डावाची सुरूवात अतिशय संथ झाली. रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पहिल्या १२ षटकात केवळ १९ धावा केल्या होत्या. त्यानंतर धावा जमवण्याच्या प्रयत्नात गिल ११ धावांवर बाद झाला तर चेतेश्वर पुजारा शून्यावर माघारी परतला. त्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी डावाला आकार दिला.