पुण्याच्या गहुंजे स्टेडियममध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात निर्णायक वनडे सामना खेळवला जात आहे. या सामन्यात नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर 330 धावांचे आव्हान ठेवले. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे भारताला तीनशेपार पोहोचता आले. या फलंदाजांव्यतिरिक्त मुंबईकर खेळाडू शार्दुल ठाकूरने 30 धावाचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत तीन षटकार ठोकले. त्यापैकी एक षटकार त्याने बेन स्टोक्सला लगावला. या षटकारानंतर स्टोक्सने त्याची चक्क बॅटच तपासली.

भारतीय डावाच्या 45व्या षटकात शार्दुलने स्टोक्सला लाँग ऑफच्या दिशेने खणखणीत षटकार खेचला. या षटकारानंतर स्टोक्सने गमतीने शार्दुलकडे जात त्याची बॅट तपासली. त्यावेळी हे दोघेही एकमेकांकडे पाहून हसताना दिसले. हे दोघेही आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचे भाग होते.

 

भारताचा डाव –

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी मागच्या सामन्यातील फॉर्म कायम राखत टीम इंडियासाठी शतकी सलामी दिली. धवनने आक्रमक फटकेबाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. दोघे संघासाठी मोठी भागीदारी रचणार असे वाटत असताना आदिल रशीदने रोहितला बाद केले. रोहित 37 धावांचे योगदान देऊन माघारी परतला. रोहित बाद झाल्यानंतर शिखर धवनही जास्त वेळ टिकला नाही. त्यानंतर विराट-राहुल मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. मधल्या फळीतील पडझडीनंतर ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याने भारताचा डाव सांभाळला. पंतने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 78 धावा केल्या. हार्दिकने 5 चौकार आणि 4 षटकारांसह 64 धावांची खेळी केली. त्यानंतर मुंबईकर शार्दुल ठाकूरने 3 षटकार आणि एका चौकारासह झटपट 30 धावांची खेळी केली. शार्दुलंनतर कृणालही 25 धावांचे योगदान देऊन बाद झाला. रीस टॉप्लेने भूवनेश्वर कुमारला बाद करत भारताचा डाव 48.2 षटकात 329 धावांवर संपुष्टात आणला.