इंग्लंडमध्ये २०१९ साली पार पडलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या आधी साखळी फेरीत धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाला फक्त यजमान इंग्लंडकडून पराभूत व्हावं लागलं होतं. महेंद्रसिंह धोनीने या सामन्यात केलेल्या संथ खेळीवर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसेच चांगल्या लयीत असणाऱ्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या खेळीबाबतही त्याने शंका व्यक्त केली होती. या मुद्द्यावरून बरीच चर्चा रंगली असताना, ‘भारतीय संघ सामना मुद्दाम हारला’, असं बोललो नसल्याचं स्पष्टीकरण बेन स्टोक्सने दिले आहे.

“ज्यावेळी धोनी फलंदाजीसाठी मैदानात आला, त्यावेळी भारताला ११ षटकांमध्ये ११२ धावा हव्या होत्या. धोनी विचित्र पद्धतीने फलंदाजी करत होता. भारत अखेरच्या दोन षटकांतही जिंकू शकला असता, पण धोनी आणि केदार जाधव खेळत असताना ते जिंकण्यासाठी खेळत आहेत असं अजिबात वाटत नव्हतं”, असे स्टोक्सने On Fire या आपल्या पुस्तकात नमूद केले आहे. “सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघांनी संघाला बॅकफूटवर ढकललं. आमच्या गोलंदाजांवर दबाव टाकण्याची जराही तसदी त्यांनी घेतली नाही”, असेही त्याने लिहिले आहे.

स्टोक्सच्या या विधानानंतर पाकिस्तानचा माजी गोलंदाज सिकंदर बख्त याने भारत इंग्लंडशी मुद्दाम हारल्याचा दावा स्टोक्सने आपल्या पुस्तकात केला असल्याचे म्हटले. त्यावर एका ट्विटर युझरने याबाबतचा पुरावा मागितला.

या मुद्द्यावर ट्विट करत बेन स्टोक्सने स्पष्टीकरण दिले. “भारत मुद्दाम हारला असं माझ्या पुस्तकात लिहिलेलं नक्कीच कोणालाही सापडणार नाही, कारण मी तसं अजिबात बोललेलो नाही. ही केवळ शब्दांची फिरवाफिरव आहे”, असे स्टोक्लने सांगितले.

दरम्यान, इंग्लंडने या सामन्यात ७ गडी गमावत ३३७ धावा केल्या होत्या, पण भारतीय संघाला हे आव्हान पेलवलं नाही. या दरम्यान सोशल मीडियावर उपांत्य फेरीत पाकिस्तानशी सामना होऊ नये व पुढील सामन्यात पाकिस्तानचे रनरेटचे गणित बिघडावे यासाठी भारत इंग्लंडविरुद्धचा सामना हारला अशी चर्चा क्रिकेटप्रेमींमध्ये रंगली होती.