05 March 2021

News Flash

नाटय़मय दिवस मुंबईचाच

मुंबई आणि बंगाल या दोन्ही ‘दादा’ संघांतील रणजी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच नाटय़मयरीत्या रंगला, पण यामध्ये बाजी मारली ती मुंबईच्याच संघाने. अपयश-यशाच्या हिंदोळ्यावर रंगलेल्या दुसऱ्या

| December 3, 2012 12:28 pm

मुंबई आणि बंगाल या दोन्ही ‘दादा’ संघांतील रणजी सामन्याचा दुसरा दिवस चांगलाच नाटय़मयरीत्या रंगला, पण यामध्ये बाजी मारली ती मुंबईच्याच संघाने. अपयश-यशाच्या हिंदोळ्यावर रंगलेल्या दुसऱ्या दिवशी मुंबईला यशाने सुरुवातीला हुलकावणी दिली, पण त्यानंतर यशाचे माप पदरात पडले ते मुंबईच्याच. मुंबईचा पहिला डाव २९७ धावांवर आटोपला, पण त्यानंतर तीन झेल सोडूनही भेदक माऱ्याच्या जोरावर मुंबईने बंगालला पहिल्या डावात २०१ धावांवर गुंडाळत आघाडी मिळवली. मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांनी दुसऱ्या डावात सावधपणे खेळ केल्याने मुंबईची दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ६ धावा अशी परिस्थिती असून त्यांच्याकडे एकूण १०२ धावांची आघाडी आहे. तिसऱ्या दिवशी मोठी धावसंख्या उभारून मोसमातील पहिल्या विजयाठी मुंबईचा संघ प्रयत्नांची पराकाष्ठा करेल.
आयरेश सक्सेनाने आपल्या पहिल्याच षटकात मुंबईचा धावफलक हलता ठेवणाऱ्या धवल कुलकर्णी (३७) आणि क्षेमल वायंगणकर (४) यांना बाद करत मुंबईला दुहेरी धक्के दिले. तर लक्ष्मी रतन शुक्लाने रमेश पोवारला (१७) बाद करत डावातील पाचवा बळी मिळवला आणि मुंबईला २९७ धावांत रोखले.
अचूक गलंदाजी आणि अप्रतिम क्षेत्ररक्षणाच्या जोरावर मुंबईने नवव्याच षटकांत बंगालची २ बाद २० अशी दयनीय अवस्था केली. यानंतर बंगालला मुंबईने झटपट गुंडाळले असते, पण वासिम जाफरने अरिंदम दासला १८ धावांवर असताना व मनोज तिवारीला २३ धावांवर असताना जीवदान दिले आणि बंगालला डाव सावरण्याची चांगली संधी मिळाली. या जीवदानाचा फायदा अरिंदमने उचलला असला तरी भारताच्या संघात प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेल्या तिवारीला (३९) याचा फायदा उचलता आला नाही, अंकित चव्हाणने त्याचा काटा काढला. त्यानंतर रमेश पोवारने आपल्याच पहिल्याच षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वृद्धिमान साहाला त्रिफळाचीत केले खरे, पण हा चेंडू ‘नो बॉल’ असल्याने साहाला जीवदान मिळाले. पण या जीवदानाचा त्याला काहीच फायदा उचलता आला नाही. पोवारने त्यानंतरच्याच चेंडूवर साहाला कौस्तुभ पवारकडे झेल देण्यास भाग पाडले आणि भोपळाही न फोडता साहा तंबूत परतला.
बंगालच्या एका बाजूने विकेट पडत असताना दुारी बाजू मात्र अरिंदमने चांगली लावून धरली होती, साहानंतर त्याला सुभोमॉय दास (१९) चांगली साथ देत होता. चहापानानंतरच्या अंकितच्या पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर सुभोमॉयचा सोपा झेल हिकेन शाहने सोडला, पण अंकितने त्यानंतरच्याच चेंडूवर त्याला जाफरकरवी बाद केले. झेल सुटत असले तरी मुंबईचे गोलंदाज हताश झाले नाहीत, अपयश हीच यशाची पायरी असते, असे मानत त्यांनी अपयश पचवून चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर यशाने मात्र त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना हुलकावणी दिली नाही. सुभोमॉय बाद झाल्यावर बंगालच्या डावाला उतरती कळा लागली आणि अरिंदम एकाकी पडला. अंकित आणि क्षेमल वायंगणकर यांनी बंगालच्या शेपटाला जास्त वळवळ करायला दिली नाही आणि त्यांचा पहिला डाव २०१ धावांत संपुष्टात आला. अंकितने या वेळी अप्रतिम मारा करत सर्वाधिक ४ बळी मिळवले. एकाकी पडलेल्या अरिंदमला या वेळी शतक पूर्ण न केल्याचे शल्य नक्कीच बोचत राहील. त्याने १९९ चेंडूंत १६ चौकारांच्या मदतीने नाबाद ९८ धावांची खेळी साकारत एकाकी झुंज दिली.
दुसऱ्या डावात फलंदाजीला आलेल्या वासिम जाफर (खेळत आहे ४) आणि कौस्तुभ पवार (खेळत आहे १) या मुंबईच्या सलामीवीरांनी सावध पवित्रा घेत दिवस खेळू काढण्याचे काम चोख बजावले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव : १०५.१ षटकांत सर्व बाद २९७ (वासिम जाफर ८०; लक्ष्मी रतन शुक्ला ५/३८) बंगाल पहिला डाव : ६५.४ षटकांत सर्व बाद २०१ (अरिंदम दास नाबाद ९८; अंकित चव्हाण ४/६१) मुंबई दुसरा डाव : ३ षटकांत बिनबाद ६.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2012 12:28 pm

Web Title: bengal batsmen flounder as mumbai take 96 run 1st inings lead
Next Stories
1 राज्यस्तरीय व्यावसायिक कबड्डी स्पर्धा : सुवर्णयुगची विजेतेपदावर मोहोर
2 रवींद्र जडेजाचा त्रिशतकांचा विक्रम
3 इंग्लंड संघाचा नेटमध्ये कसून सराव
Just Now!
X