खेळ म्हटलं की त्यामध्ये जय-पराजय या गोष्टी आल्याच…मात्र बंगालच्या 19 वर्षाखालील हॉकी संघाला सामना गमावल्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. प्रशिक्षकांनी सामना हरल्याची शिक्षा म्हणून सर्व खेळाडूंना मुंडन करायला भाग पाडलं आहे. जबलपूर येथे 19 वर्षाखालील राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.

यावेळी आपला संघ सामना गमावतो आहे हे पाहून, बंगालच्या संघाचे प्रशिक्षक आनंद कुमार यांनी मध्यांतराला आपल्या खेळाडूंना चांगलंच फैलावर घेतलं. सामना गमावलात तर सर्वांना मुंडन करायला भाग पाडेन असंही आनंद कुमार आपल्या खेळाडूंना म्हणाले. बंगालने हा सामना गमावल्यानंतर 18 जणांच्या एकूण संघातील दोघांचा अपवाद वगळता सर्व खेळाडूंनी आपलं मुंडन केलं आहे. साहजिकच या प्रकरणाचे पडसाद उमटायला सुरुवात झाल्यानंतर बंगाल हॉकी असोसिएशनने, 3 सदस्यीय चौकशी समितीची स्थापना केली आहे. या प्रकरणी सर्व दोषींवर योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन संघटनेतर्फे देण्यात आलं आहे.

या प्रकरणी आनंद कुमार यांनीही आपली प्रतिक्रीया दिली आहे. सामना सुरु असताना मी खेळाडूंना रागावलो होतो, मात्र त्यांना मुंडन करण्याची जबरदस्ती मी का करेन? माझ्या पत्नीची तब्येत बरी नसल्यामुळे मला खेळाडूंशी बोलण्याची संधी मिळाली नाहीये, पण मी माझी बाजू योग्य पद्धतीने मांडेन. दरम्यान मुंडन केलेल्या खेळाडूंपैकी काही खेळाडूंनी आपण प्रशिक्षकांप्रती आदर म्हणून मुंडन केल्याचं म्हटलं आहे, तर काही खेळाडूंनी आपल्याला मुंडन करायला भाग पाडल्याचं म्हटलंय. त्यामुळे या प्रकरणी काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.