अहमदाबाद : रोमहर्षक लढतीत बंगाल वॉरियर्सने गुजरात फॉच्र्युनजायंट्सला २८-२६ अशा फरकाने पराभूत केले. प्रो कबड्डी लीगच्या सातव्या हंगामातील हा गुजरातचा सलग पाचवा पराभव ठरला.

अहमदाबादच्या ट्रान्सस्टॅडिया स्टेडियमवर चालू असलेल्या या स्पर्धेत बंगालने मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी मिळवली होती. दुसऱ्या सत्रात गुजरातने खेळ उंचावला. परंतु अखेरच्या चढाईत के. प्रपंजनने एक गुण मिळवत बंगालच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. चढायांचे ८ गुण मिळवणारा प्रपंजन बंगालच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मणिंदर सिंगने चढायांचे पाच गुण मिळवत त्याला छान साथ दिली. मोहम्मद नबीबक्षने अष्टपैलू खेळाचे प्रदर्शन करीत पाच गुण मिळवले. गुजरातच्या सोनूने ८ गुण मिळवले.

त्याआधी, श्रीकांत जाधवच्या दिमाखदार चढायांच्या बळावर हरयाणा स्टीलर्सने यूपी योद्धाचा ३६-३३ असा पाडाव केला. पहिल्या सत्रात हरयाणाने १६-१२ अशी आघाडी घेतली होती, ती उत्तरार्धातही टिकवली. श्रीकांतने चढायांचे ९ गुण (४ बोनस) मिळवले. मोनू गोयत (५ गुण) आणि सुमीत (४ गुण) यांनी त्याला छान साथ दिली. यूपी संघाकडून विकास खंडोलाने चढायांचे १२ गुण मिळवले, परंतु तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.

आजचा सामना

जयपूर पिंक पँथर्स वि. पुणेरी पलटण

* वेळ : सायंकाळी ७.३० वा.

* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स १ मराठी.