पुणेरी पलटणला प्रथमच पराभवाचा धक्का

बंगळुरू बुल्सविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात एका गुणाने पत्करलेला पराभव बंगाल वॉरियर्सच्या भलताच जिव्हारी लागला होता. त्या अपयशातून धडा घेत बंगालने दबंग दिल्लीला ३१-२३ असे अस्मान दाखवले आणि प्रो-कबड्डी लीगमध्ये विजयी सलामी नोंदवली. दिल्लीकडून फक्त एकटय़ा मेराज शेखने हिमतीने किल्ला लढवला. दुसऱ्या सामन्यात यजमान पुणेरी पलटणला प्रथमच पराभवाचा धक्का बसला.

गतवर्षी संपूर्ण हंगामात एक विजय आणि एक सामना अनिर्णीत अशी खराब कामगिरी करणाऱ्या दिल्लीने नवा चमू आणि नवे प्रशिक्षक सांगर बांदेकर यांच्यासह सुरुवात अतिशय चांगली केली. मध्यंतराला दिल्लीकडे १४-१३ अशी एका गुणाची आघाडीसुद्धा होती. बंगाल दहाव्या मिनिटालाच दिल्लीवर लोण चढवण्याच्या बेतात होते. परंतु मेराज शेखने दोन गुण घेत तो वाचवला. मग पहिल्या सत्राच्या उत्तरार्धात पुन्हा एकटा असताना नेत्रदीपक हनुमानउडी साकारत लोण वाचवला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीला त्याने तिसऱ्यांदा संघाचा लोण वाचवला. मेराज संघासाठी डोकेदुखी ठरत आहे, हे लक्षात आल्यानंतर बंगालचे प्रशिक्षक प्रताप शेट्टी त्याला जेरबंद करण्याची चाल रचली. रवी दलालने मेराजला चढाईत बाद केल्यामुळे तो मैदानाबाहेर गेला आणि तिकडेच दिल्लीच्या हातून सामना निसटला. मग ३२व्या मिनिटाला दिल्लीवर पहिला लोण पडला आणि अखेरच्या मिनिटाला दुसरा लोण बंगालने लादला. दिल्लीच्या मेराजने चढाईचे ७ आणि पकडीचे २ असे ९ गुण मिळवले. बंगालकडून रवी दलालने चढायांचे ६ गुण मिळवले. दुसऱ्या लढतीत गतविजेत्या पाटणा पायरेट्सने पुण्याला दोन लोणसह ३०-२४ असे हरवून यंदाच्या हंगामाची विजयी सुरुवात केली. पाटण्याच्या विजयात प्रदीप नरवाल आणि सुरजित सिंग यांच्या चढायांचा सिंहाचा वाटा होता.

आजचा सामना

पुणेरी पलटण वि. दबंग दिल्ली

सामन्याची वेळ : रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स