नॉर्थइस्ट युनायटेडवर १-० अशी मात; मिकूचा ४७व्या मिनिटाला निर्णायक गोल

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) साखळी लढतींमध्ये बेंगळूरु एफसीने शुक्रवारी नॉर्थईस्ट युनायटेड एफसीवर १-० असा विजय मिळवला. व्हेनेझुएलाच्या मिकूने ४७व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.

इंदिरा गांधी अ‍ॅथलेटिक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफलक कोरा होता. मात्र दुसऱ्या सत्रात दुसऱ्या मिनिटाला निर्मल छेत्रीने पाठीमागून दिलेल्या पासवर नॉर्थईस्ट क्लबचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेशन याने चेंडू नीट अडवण्याऐवजी सहकारी जोस गोन्सालविस यांच्याकडे दिला, मात्र तो चुकला.

त्याच्या ढिलाईचा फायदा बेंगळूरुला झाला. चेंडू जोसऐवजी उदांता कुमाम सिंग याच्याकडे गेला. त्याने चपळाई दाखवत चेंडूवर ताबा मिळवला आणि उजव्या बाजूने मिकू याला पास दिला. त्यावेळी मिकू याने कुठलीही चूक न करता चेंडू गोलजाळय़ात भिरकावला. अशाप्रकारे गोलरक्षक रेहेनेश याला चुकीची मोठी किंमत मोजायला लागली.

दुसऱ्या सत्रात ७१व्या मिनिटाला बेंगळूरुला आघाडी वाढवण्याची संधी होती, मात्र गॅर्सियाने दिलेल्या पासचा फायदा लेनी रॉड्रिग्जला उठवता आला नाही. चेंडू मारताना तो मैदानावर पडला. मात्र उर्वरित सामन्यात आघाडी राखताना बेंगळूरु एफसीने प्रतिस्पध्र्यावर वर्चस्व राखले. बेंगळूरु एफसीचा हा चार सामन्यांतील तिसरा विजय आहे.

एफसी गोवाविरुद्धच्या पराभवानंतर त्यांनी वेळीच सावरले. तसेच ४ सामन्यांतून ९ गुण मिळवत गुणतालिकेमध्ये पुन्हा अव्वल स्थान मिळवले. दुसऱ्या स्थानी असलेल्या चेन्नईयन एफसीचेही ४ सामन्यांतून ९ गुण झाले, मात्र सरस गोलफलकाच्या आधारे बेंगळूरुने पहिले स्थान पटकावले. बेंगळूरुने १० गोल करताना ५ खाल्ले आहेत. चेन्नईयनचा फरक ९-५ असा आहे.