‘ले पंगा’ या शीर्षकासह सुरू झालेला प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या हंगामाचा थरार आता शिखरावर पोहोचला आहे. महिनाभर आठ विविध शहरांमध्ये दमदार संघांना टक्कर देत यू मुंबा आणि बंगळुरू बुल्स या संघांनी अंतिम फेरी गाठली आहे. रविवारी संध्याकाळी जेतेपदावर नाव कोरण्यासाठी वरळीच्या एनएससीआयच्या सरदार वल्लभभाई पटेल इन्डोअर स्टेडियममध्ये मुकाबला रंगणार आहे. घरच्या मैदानावर, मुंबईकरांच्या जल्लोषी पाठिंब्यात यू मुंबा जेतेपदाला गवसणी घालणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनुप कुमारच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या यू मुंबाला पहिल्या हंगामात उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अभिषेक बच्चन सहमालक असलेल्या जयपूर पिंक पँथर्सने प्रो कबड्डी लीगच्या पहिल्या हंगामाचे जेतेपद पटकावले होते. अंतिम फेरीत दाखल होऊनही यू मुंबाला जेतेपदाने हुलकावणी दिली होती. यंदा जेतेपदाचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी यू मुंबाचा संघ सज्ज झाला आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तब्बल दीड महिना आधीच यू मुंबाने सरावाला सुरुवात केली होती. अनुप कुमार, शब्बीर बापू आणि रिशांक देवाडिगा या त्रिकुटावर यू मुंबाच्या आक्रमणाची जबाबदारी आहे. जीवा कुमारसारखा अनुभवी खेळाडू असल्याने मुंबईची बचावफळीही मजबूत आहे.
दुसरीकडे चाचपडत सुरुवातीनंतर बंगळुरू बुल्सने कामगिरीत सातत्य आणत खेळाचा दर्जाही सुधारला आहे. उपांत्य फेरीच्या लढतीत बुल्सने तेलुगू टायटन्सवर दणदणीत विजय मिळवला होता. या प्रदर्शनामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला आहे. अजय ठाकूर, धर्मराज चेरालथन आणि मनजीत चिल्लर या तिघांकडून बंगळुरूला दमदार खेळीची अपेक्षा आहे. यू मुंबाने यंदाच्या हंगामात १५ पैकी केवळ २ लढती गमावल्या आहेत. त्यामुळे बुल्सला अंतिम लढतीत जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. यंदाच्या हंगामात या दोन संघांदरम्यान झालेल्या लढतींतही यू मुंबानेच बाजी मारली आहे. त्यामुळे रविवारी होणाऱ्या अंतिम लढतीत यू मुंबाचेच पारडे जड आहे.
‘‘अंतिम लढत खडतर असते. कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. बुल्सकडे एका चढाईपटूची कमतरता आहे. मनजीतला झटपट टिपल्यास सामन्याचे पारडे आमच्याकडे झुकू शकते,’’ असे यू मुंबाचा कर्णधार अनुप कुमारने सांगितले.
आमनेसामने
यू मुंबा २
बंगळुरू बुल्स ०
थेट प्रक्षेपण :
स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स एचडी २, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार स्पोर्ट्स एचडी ३, स्टार गोल्ड, मा मूव्हीज, स्टार प्रवाह, सुवर्णा
वेळ :
रात्री ७.५० पासून
संघ
यू मुंबा- अनुप कुमार, अनुप ई.व्ही., गोपालप्पा थिमारयप्पा, के. प्रापंजन, मायासुकी शिमोकावा, ओंकार जाधव, पवन कुमार, प्रदीप कुमार, रिशांक देवाडिगा, शब्बीर बापू, सुलेमान कबीर, सुरेसू कुमार, विनोद अत्यालकर, विनोद पायुलस, विशाल माने, मोहित चिल्लर, फझल अत्राचली, जीवा गोपाळ, सुरेंदर नाडा, जीवा कुमार, भूपिंदर सिंग, जवाहर विवेक. बंगळुरू बुल्स- मनजीत चिल्लर, अजय ठाकूर, आशीष चाकोर, दीपक दहिया, प्रदीप नरवाल, राजेश मोंडल, राकेश नरवाल, सिनोथरन कनेशारजाह, सुनील हनुमानथप्पा, वैभव काळे, विंतोष कुमार, आदिनाथ गवळी, आशीष कुमार, प्रमोद नरवाल, सोमवीर शेखर, गुरप्रीत सिंग, ए. केटूट अरिना, धर्मराजन चेरालथन, जोगिंदर नरवाल, संदीप मलिक, मिकेल स्पिक्झो, प्रीतम चिल्लर