News Flash

‘बळी’राजे

क्रिकेट हा खेळ फलंदाजांचा. गोलंदाजांना ते बडवताना पाहणे हे अनेकांना आवडते. काहींना त्यात अगदी आसुरी आनंद मिळतो.

| August 2, 2015 02:39 am

क्रिकेट हा खेळ फलंदाजांचा. गोलंदाजांना ते बडवताना पाहणे हे अनेकांना आवडते. काहींना त्यात अगदी आसुरी आनंद मिळतो. एकंदरच या गोलंदाजांवर प्रेम करणारे सच्चे क्रिकेटप्रेमी तुरळकच. याच सच्च्या क्रिकेटप्रेमींसाठी या आठवडय़ात एक अद्भुत योगायोग दाखवणारी घटना घडली. आपल्या भेदक गोलंदाजीने प्रतिस्पध्र्याना जेरीस धरत स्वत:चा अमीट ठसा उमटवणाऱ्या तीन गोलंदाजांनी शिखराला गवसणी घातली. ते म्हणजे डेल स्टेन, जेम्स अँडरसन आणि मिचेल जॉन्सन. स्टेन आणि अँडरसन यांनी कसोटी कारकीर्दीमध्ये चारशे बळींचा टप्पा गाठला, तर जॉन्सनने तीनशे बळी पूर्ण केले.
स्टेन म्हणजे आफ्रिकेच्या गोलंदाजीचा कणा आणि फलंदाजांचा कर्दनकाळ; आपल्या तेजतर्रार गोलंदाजीने फलंदाजांचा थरकाप उडवणारा. स्टेनचा जन्म एका छोटय़ाशा खेडय़ातला. मोकळ्या माळरानामध्ये गेलेलं उनाड बालपण; पण क्रिकेटची हौस मात्र भारी. माजी कर्णधार हॅन्सी क्रोनिएने त्याला क्रिकेटचे साहित्य ख्रिसमसची भेट म्हणून दिली होती. ११व्या वर्षी स्टेन क्रिकेट खेळायला लागला, तेव्हा त्याचा वेग पाहून लोकांना आश्चर्य वाटायचे; पण लहानशा खेडय़ातला डेल आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊ शकणार नाही, असे बऱ्याच जणांना वाटायचे; पण हिऱ्याची चमक जशी लपून राहत नाही, तसेच स्टेनच्या बाबतीतही घडले. एकामागून एक यशाच्या पायऱ्या चढत, भरपूर मेहनत घेत तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आला. पहिल्या सामन्यात आपली चुणूक दाखवली; पण त्यानंतर ९ षटकांमध्ये आठ नोबॉल टाकत ४७ धावा दिल्यामुळे तो संघाबाहेर फेकला गेला; पण अपयश त्याच्यासाठी काही नवीन नव्हते. पुन्हा एकदा संघात स्थान मिळवण्याच्या ईर्षेने तो पेटून उठला आणि संघात स्थान पटकावण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर मात्र त्याने अपयशाचे तोंड पाहिले नाही. स्टेन गोलंदाजीसाठी धावत येत असताना थरकाप उडवतो. तो नेमका किती जलद चेंडू टाकेल याची कल्पनाही करवत नाही, कधीकधी संथ चेंडू टाकून तो फलंदाजांना बुचकळ्यातही पाडतो. यष्टीचा अचूक निशाणा साधणारा आणि फलंदाजाना कायम कोडय़ात टाकून घाबरवणारा गोलंदाज म्हणजे स्टेन, ही बिरुदावली त्याची त्यालाच.
जेम्स अँडरसन म्हणजे इंग्लंडचा लाडका ‘जिमी’. बालपणापासूनच क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न त्याने सत्यात उतरवले. सुरुवातीला तो आपल्या वेगासाठी आणि केशरचनेसाठी प्रसिद्धीझोतात आला होता; पण कालांतराने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करत तो इंग्लंडचा हुकमी एक्का ठरला. भारताचा वेगवान झहीर खानला पाहून जिमी ‘रीव्हर्स स्विंग’ शिकला आणि त्याच्या जोरावर त्याने भारताचीच त्यांच्या मैदानात दैना उडवली. एकदा अँडरसन फॉर्मात आला तर प्रतिस्पर्धी संघ किती मिनिटांत बाद होईल, हे सांगणे कठीणच. जिमीला बघून भीती वाटत नाही, पण त्याची गोलंदाजी मात्र फेफे उडवणारीच. २००३साली लॉर्ड्सवर कसोटी पदार्पण करताना त्याने पहिल्याच डावात पाच बळी मिळवले. त्यानंतर बऱ्याचदा त्याने इंग्लंडला आपल्या कामगिरीवर यश मिळवून दिले आहे. खेळपट्टी, वातावरण आणि प्रतिस्पर्धी संघ कोणताही असला तरी जिमीला फरक पडत नाही. कर्णधाराला जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कामी येणारा, कोणतेही षटक टाकण्यास सज्ज असलेला इंग्लंडला बऱ्याच वर्षांनी जिमीच्या रूपात सातत्यपूर्ण भेदक मारा करणारा वेगवान गोलंदाज भेटला आहे. तब्बल १२ वर्षांनंतरही तो थकलेला नक्कीच वाटत नाही, जेव्हा गोलंदाजीला येतो तेव्हा कायम वाऱ्याचा वेग घेऊनच.
डेनिस लीलीनंतर ऑस्ट्रेलियाला ग्लेन मॅकग्रा लाभला, त्यानंतर ब्रेट ली. हे तिन्ही गोलंदाज फलंदाजांचा थरकाप उडवायचे. त्यानंतर मिचेल जॉन्सन हा त्यांच्या पठडीतला गोलंदाज ऑस्ट्रेलियाच्या संघात पाहायला मिळतो. डाव्या हातामध्ये चेंडू घेऊन लयबद्धता कायम ठेवत जेव्हा तो यष्टीजवळ येतो तेव्हा अधिक भेदक वाटतो. अ‍ॅशेस मालिकेसाठी २००६ साली त्याची निवड झाली खरी, पण वर्षभर फक्त तो संघाबरोबरचा प्रवासीच होता. १० नोव्हेंबर २००७ मध्ये त्याने घरच्या ब्रिस्बेनच्या मैदानावर पदार्पण केले. २००८ साली त्यांनी दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानात हैराण केले, तर त्यांच्याच मातीत त्यांची दैना उडवली. एका षटकात २६ धावा फटकावणारा तो ऑस्ट्रेलियाचा एकमेव फलंदाज ठरला. जॅक कॅलिस आणि ग्रॅमी स्मिथ यांना अप्रतिमपणे बाद केल्यावर जगातला अव्वल गोलंदाज, अशी त्याची गणना व्हायला लागली. याच मालिकेत त्याने ६६ चेंडूंमध्ये नाबाद १२३ धावांचा पराक्रमही करून दाखवला; पण कामगिरी ढासळल्याने त्याला वगळले. पण जिद्दी जॉन्सन पुन्हा मैदानात परतला. कर्णधार रिकी पॉन्टिंगचा त्याच्यावर विश्वास होताच. त्याने तो सार्थ ठरवला. त्यानंतर त्याने वर्षभरात ६३ बळी मिळवले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा तोफखाना म्हणून त्याची गणना व्हायला लागली.
वेगवान गोलंदाजांचे मैदानातील आयुष्य तसे फार जास्त नसते. दुखापती तर त्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या असतात, पण या त्रिमूर्तीनी आपला फिटनेस कायम राखत प्रतिस्पध्र्याची भंबेरी कायम उडवलेली आहेच. यापुढेही क्रिकेटजगताला हे ‘बळी’राजे आनंद देत राहतील आणि एकामागून एक यशाचे, विक्रमांचे शिखर चढतील, अशीच आशा करू या.

– प्रसाद लाड
prasad.lad@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 2:39 am

Web Title: best bowler
टॅग : Best
Next Stories
1 भारत ‘अ’ संघाचे नेतृत्व उन्मुक्त चंदकडे
2 सानिया मिर्झाची ‘खेलरत्न’साठी शिफारस
3 नेहमीच जबाबदारीने खेळतो कोहली
Just Now!
X