करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारतर्फे २१ दिवस लॉकडाऊन घोषित करण्यात आलेलं आहे. या काळात देशातील सर्व महत्वाच्या क्रीडा स्पर्धा रद्द झालेल्या आहेत. भारतीय क्रिकेटपटू सध्या आपल्या घरात राहून परिवारासोबत वेळ घालवत आहेत. मुंबईकर श्रेयस अय्यरने गेल्या काही दिवसांत आपल्या घरात जादुच्या प्रयोगाचे काही व्हिडीओ बनवले होते. सोशल मीडियावर त्याच्या या प्रयत्नाला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. यानंतर श्रेयस आपल्या कुत्र्यासोबत कॅचिंग प्रॅक्टिस करतोय. हा व्हिडीओ त्याने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसननेही अशाच पद्धतीने आपल्या कुत्र्यासोबत कॅचिंग प्रॅक्टिस करत वेळ घालवला होता. अनेक क्रिकेटपटू आपल्या मुलांसोबत तर काही खेळाडू स्वयंपाक घरात आपला हात आजमावत आहेत.

सध्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जगभरातील क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयनेही आयपीएलसह सर्व महत्वाच्या स्पर्धा पुढे ढकलल्या आहेत. जपाननेही यंदाच्या वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन एक वर्षासाठी पुढे ढकललं आहे. अनेक महत्वाच्या देशात अद्यापही करोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही स्पर्धा खेळवणं योग्य नसल्याचं मत अनेक क्रीडापटूंनी व्यक्त केलं होतं.