नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेच्या धोरणानुसार भारतीय बॉक्सिंग महासंघाने व्यावसायिक बॉक्सिंगपटूंना हौशी देशांतर्गत स्पर्धाची दारे खुली केली आहेत.

गुरुवारी झालेल्या भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि तात्काळ स्वरूपात तो अमलात आणण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये पुरुषांची राष्ट्रीय बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. त्यापाठोपाठ महिलांचीही राष्ट्रीय स्पर्धा होईल. या दोन्ही स्पर्धामध्ये प्रथमच व्यावसायिक बॉक्सिंगपटू सहभागी होणार आहेत.

‘‘आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने व्यावसायिक बॉक्सिंगपटूंवरील बंधने कमी केली आहेत. याच पाश्र्वभूमीवर आम्ही नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत चर्चा केली. त्यामुळे व्यावसायिक बॉक्सिंगपटूला राज्य/राष्ट्रीय किंवा औद्योगिक स्पर्धामध्ये सहभागी होता येणार आहे,’’ अशी माहिती भारतीय बॉक्सिंग महासंघाचे सरचिटणीस जय कवळी यांनी दिली.