18 January 2019

News Flash

विश्वचषक स्पर्धेत कोणी एक दावेदार नसतो!

‘‘गतविजेता जर्मनी, माजी विजेता फ्रान्स, स्पेन आणि अर्जेटिना हे जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील.

बायचुंग भुतिया

भारताचा माजी कर्णधार भुतियाचे मत

bअवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत कोण बाजी मारेल याची उत्सुकता सर्वानाच लागली आहे. गतविजेता जर्मनी, अर्जेटिना, स्पेन आदी जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीच्या स्थानावर असले तरी विश्वचषक स्पर्धेत जेतेपदाचा असा कोणी दावेदार नसतो, असे ठाम मत भारताचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने व्यक्त केले. रशियात होणाऱ्या या विश्वचषक स्पर्धेला ३० दिवस शिल्लक राहिले असताना या स्पर्धेचे प्रक्षेपण करणाऱ्या सोनी वाहिनीतर्फे आयोजित चर्चासत्रात तो बोलत होता. मात्र, त्याने फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि अर्जेटिना यांच्या पारडे जड असल्याचा दावाही केला.

‘‘गतविजेता जर्मनी, माजी विजेता फ्रान्स, स्पेन आणि अर्जेटिना हे जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असतील. मात्र, विश्वचषक स्पर्धेत एखादा संघच बाजी मारेल, असे ठामपणे सांगू शकत नाही. येथे एक चुक तुम्हाला स्पर्धेबाहेर करण्यासाठी पुरेशी ठरू शकते. बेल्जियम आश्चर्यचकित कामगिरी करू शकतो. त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे जर्मनी आणि फ्रान्स आदी बलाढय़ संघ जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असले तरी बेल्जियमसारखे संघ या स्पर्धेत धक्कादायक निकाल नोंदवू शकतात,’’ असे भुतिया म्हणाला.

आशिया चषक स्पर्धेत नशिबाने चांगला गट मिळाला

आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाला नशिबाने चांगला गट मिळाला आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश करण्याची भारतीय संघाला संधी आहे, असा विश्वास भुतियाने व्यक्त केला. ‘‘आशिया चषक स्पर्धेच्या साखळी फेरीत बलाढय़ संघाचा सामना करावा लागणार नाही, हे भारतीय संघाचे नशिबच म्हणावे लागेल आणि त्यामुळे मी आनंदी आहे. पण, त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रत्येक सामन्यात ताकदीने खेळ करावा लागेल आणि तसे केल्यास बाद फेरीत प्रवेश निश्चित होईल,’’ असे भुतिया म्हणाला.

First Published on May 16, 2018 2:55 am

Web Title: bhaichung bhutia prediction on football world cup